कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील जयंती नाला परिसर ते महावीर महाविद्यालयाच्या पिछाडीस असलेल्या शेतात आढळलेल्या सहा गव्यांचा कळप अजूनही कोल्हापूरच्या वेशीवरच आहे. पंचगंगा नदीकाठावर भरपूर प्रमाणात गवत मिळाल्याने या गव्यांचा मुक्काम वाढल्याचा अंदाज आहे. शनिवारी दिवसभरात दोन गवे दिसल्याचा दावा कांही प्रत्यक्षदर्शींनी केला आहे.गव्यांचा हा कळप परतल्याचा दावा वनविभागाने शुक्रवारी दुपारी केला होता, मात्र शुक्रवारी सायंकाळीच त्यांचा वावर रमणमळा परिसरात असल्याचे ठसे आढळल्याने वनविभागाने गस्त वाढवली. गुरुवारी रात्री वनविभागाच्या हातकणंगले येथील पथक परत गेले होते. शुक्रवारी आठजणांच्या संयुक्त रेस्क्यू टीमने हे गवे शहरात येऊ नयेत, यासाठी मिरच्यांच्या धुरी आणि शेकोटी पेटवून ठेवली होती. मात्र हे गवे पंचगंगा नदीपात्रात वडणगेच्या रस्त्याने आल्या मार्गे परत गेलेले नाहीत. वनविभागाच्या पथकाला गव्यांच्या पावलांचे ठसे आढळल्याने हे गवे अजूनही कोल्हापूरच्याच वेशीवर असल्याचे वनविभागाने सांगितले आहे.कोल्हापूर शहर परिसरात पूर्ण वाढ झालेले गवे आल्यामुळे वनविभाग सतर्क झाला होता. सोनतळी, खुपीरे, वडणगे या मार्गाने गेल्या आठवड्यात कोल्हापूर शहराजवळ आलेल्या गव्यांनी परिसरातील उसात मुक्काम ठोकला होता. या कळपात मादी आणि एका पिलाचा समावेश आहे. दक्षता म्हणून करवीरच्या प्रादेशिक वनविभागाने शनिवारीही वनकर्मचारी तैनात ठेवले आहेत.
करवीरचे वनक्षेत्रपाल रमेश कांबळे, वनपाल विजय पाटील, वनरक्षक मोहन देसाई, दिलीप खंदारे, अरुण खामकर, संदीप हजारे, वनसेवक बाबासाहेब जगदाळे, गजानन मगदूम, लक्ष्मण कुंभार यांच्यासह वनक्षेत्रपाल सुनील खोत, वनपाल संदीप शिंदे, सागर परकारे, सागर यादव यांचे फिरते पथक चोवीस तास गस्त घालत आहे.