खरं तर पहिल्यांदा भिती या गोष्टीची वाटतेय की कोल्हापूरात पुण्यात चार महिन्यांपूर्वी घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये. कारण पुण्यात अतिउत्साही मुर्ख लोकांच्या बघ्यांच्या गर्दीने गव्याला पळवून पळवून दमवून त्याचा जीव घेतला होता. कोल्हापूर शहरामध्ये गवा आलाय ही बातमी वाऱ्यासारखी पसरली असल्यामुळे आमच्या भागातील बघ्यांची गर्दी पंचगंगा नदीच्या दिशेने जाऊ लागल्याने धास्ती आणखीनच वाढली.तिथे जाणाऱ्या मित्रांबरोबरच काही लोकांनी मला विचारलंच, गवा पकडायला तुम्ही गेला नाही ?गवा पकडायला कशाला हवाय, त्याला परत पाठवण्यासाठी वनविभाग आणि रेस्क्यू टीम त्यांचं कार्य करत असताना बघ्यांच्या गर्दीतील एक म्हणून आम्ही कशाला गर्दी वाढवायची.. असं सांगून तुम्हीही उगाच गर्दी करायला तिथे जाऊ नका हे सांगण्याचा प्रयत्न केला, पण निघण्याच्या पूर्ण तयारीत असणाऱ्या गाड्या मागे वळल्या नाहीत. म्हणूनच म्हणावसं वाटलं, शहरात पुन्हा चुकून आला गवा.. पण माणसांना अकलेचा डोस कुणी द्यावा ?त्यावेळी मात्र बाबा आमटेंच्या बोलण्याची आठवण झाली, आमटे परिवारानं जेव्हा आदिवाश्यांच्या साठी कार्य करायचं ठरवलं तेव्हा पहिल्यांदा ते जंगलात गेल्यानंतर शर्ट पँन्ट घातलेलं आणि आपल्यापेक्षा वेगळं कुणीतरी दिसतय म्हणून काहीजण घाबरून पळायचे, तर काहीजण उत्सुकतेपोटी विनाकारण गर्दी करायचे आणि नंतर त्यांच्या समुदायातील लोकांनाही ते दाखवायला हळूहळू घेऊन यायचे. रोज प्राण्यांची शिकार करून पोट भरणाऱ्या आदिवाश्यांच्या विचारांमध्ये नंतर आमटे परिवाराने बदल सुध्दा केला आणि वन्यजीवांचे मोठ्या प्रमाणात संरक्षण झाले.आज त्या घटनेला कित्येक वर्ष उलटली.. ते जंगलातील अशिक्षित आदिवासी सुधारले, ज्या जनावरांना मारून स्वतःचे पोट भरायचे त्याच जनावरांचे जीव भुतदयेसाठी वाचवू लागले. पण शहरातील सुशिक्षित लोकांचं काय ? आदिवासी तर अज्ञानापायी आणि उत्सुकतेपोटी गर्दी करायचे, पण चुकून शहरात आलेल्या वन्यजीवाला बघायला गर्दी करून आणि गोंधळ घालून त्या मुक्या जीवाला दमवून त्याचा जीव घ्यायचा ही शहरातील सुशिक्षितांची कसली अघोरी मानसिकता ?रानगवा दिसताना जरी भारदस्त आणि भक्कम दिसत असला तरी त्याचे हृदय खूप नाजूक असते. अहो माणसाच्या हृदयावर सुध्दा एखाद्या ऐकीव गोष्टीचा परिणाम होतो आणि भितीने कधीतरी जीव सुध्दा जातो. इथे तर शेकडो लोक या बिचाऱ्या मुक्या जीवाच्या समोर जमून हातात काठ्या घेऊन, आरडाओरडा करत, काही अतिशहाणे लांबून दगडफेक करत असतात. त्याच्या जीवाचे भितीने काय हाल होत असतील याचा तरी विचार करा !फिरतं जनावर आहे, वनविभाग त्याला आलेल्या मार्गे किंवा दुसऱ्या मार्गे पुन्हा वनात त्याच्या अधिवासात पाठवण्यासाठी मार्ग दाखवेलच, पण तुमच्या मोबाईल मध्ये फोटो व्हिडीओ करण्याच्या नादात आणि गर्दीच्या गोंधळात त्याचा जीव घेऊ नका !प्राणीमित्रधनंजय वामन नामजोशी (नाना)
शहरात पुन्हा चुकून आला गवा.. पण माणसांना अकलेचा डोस कुणी द्यावा ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2021 6:06 PM