करवीर तालुक्यातील सांगरुळ येथे सोमवारी पिसाळलेल्या कुत्र्याने कासोटे पाणंद येथील आदिनाथ कासोटे याचा चावा घेतला. यानंतर कुत्र्याने गावात प्रवेश करून आक्काताई घाडगे, समर्थ मंडगे, प्रथमेश घुंगुरकर यांचा चावा घेतला. त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र सांगरूळ येथे उपचार करण्यात आले. दरम्यान, यातील आक्काताई घाडगे आणि समर्थ मंडगे यांना मोठ्या प्रमाणात चावा घेतल्याने त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये पाठविण्यात आले. या कुत्र्याने गावातील इतर कुत्र्यांनाही चावा घेतल्यामुळे ती कुत्रीही पिसाळण्याची शक्यता असल्याचे ग्रामस्थांतून बोलले जात आहे.
दरम्यान, सांगरुळमध्ये भटक्या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वावर झाल्याने या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.