आंबा : गेल्या चोवीस तासांतील अतिवृष्टीमुळे आंबा ते मलकापूर या दरम्यान महामार्गावर सात ठिकाणी कडवीच्या पुराचे पाणी आल्याने कोल्हापूर-रत्नागिरी महामार्ग रात्री उशिरापर्यंत बंद राहिला. केर्ले, घोळसवडे, लव्हाळा, निळे, भोसलेवाडी, पायरवाडी, येलूर या सात ठिकाणी कडवी नदीच्या पुराचे पाणी पहाटे एक वाजल्यापासून वाहू लागले.
पहाटे दोन वाजता बारडवाडी (ता. राधानगरी) येथील २२ कामगारांना चिपळूणला घेऊन जाणारा ट्रक घोळसवडे येथे महामार्गावर पाण्यात अडकला. त्यापाठोपाठ इंचलकरंजीहून आलेला टेम्पोही घोळसवडे पुलावर बंद पडला. चालक तोशिफ बाबासो मुजावर व गुरुदास दशराज खवले हे पुरात अडकले. पुढे काहीच दिसेना म्हणून गाडीतूनच डीपर देत मदतीची वाट पाहू लागले. तासाभराने पहाटे तीनच्या सुमारास केर्ले गावच्या पाच तरुणांनी साखळी धरून दोघांना गाडी बाहेर काढले. सकाळी मोनेरा फाउंडेशनचे कार्यकर्ते पूरस्थळी पोहोचले. त्यावेळी घोळसवडे केर्ले दरम्यान सव्वाशे वाहनांची रांग होती. बंद पडलेला टेम्पो ट्रॅक्टरच्या सहाय्याने काढून त्यातील बावीस कामगारांना घरी परतण्याची व्यवस्था केली.