सांगली : तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्याच्या राष्ट्रवादीच्या आवाहनास प्रतिसाद देण्याचा निर्णय भाजपच्या दिल्लीतील बैठकीत घेण्यात आल्याचे समजते. पक्षातील एका वरिष्ठ नेत्याने यास दुजोरा दिला असून, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडून उद्या दि. १९ मार्च रोजी याविषयीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीने आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमनतार्इंना उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्याचदिवशी सर्वच पक्षांनी बिनविरोधच्या आवाहनास पाठिंबा देत निर्णय जाहीर केले. एकट्या भाजपसाठी बिनविरोधचे घोडे अडले आहे. खासदार संजय पाटील व माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी निवडणूक लढविण्याचा प्रस्ताव पक्षाकडे दिला आहे. प्रदेश कार्यकारिणीकडून याबाबत निर्णय होईल, असे वाटत असतानाच हा मुद्दा दिल्ली दरबारी गेल्यामुळे जिल्ह्यातील पक्षाचे कार्यकर्ते ‘सलाईन’वर आहेत. तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादीने आवाहन केल्यानंतर कॉँग्रेस, शिवसेना, शेकाप, मनसे, स्वाभिमानी शेतकरी संघटना अशा सर्वच पक्षांनी त्यास लगेच प्रतिसाद देत निर्णय घेतले, मात्र भाजपने अजूनही निर्णय घेतला नाही. संजय पाटील आणि घोरपडे यांनी गत आठवड्यात कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यानंतर ही पोटनिवडणूक भाजपने लढवावी, असा प्रस्ताव प्रदेश कार्यकारिणीकडे सादर केला. गेल्या चार दिवसांपासून मुंबईत याबाबत चर्चा सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडून याबाबतचा निर्णय होईल, असे वाटत असतानाच या निर्णयास ‘दिल्ली’चे सलाईन लागले. बुधवारी दिल्लीत प्रदेशाध्यक्ष दानवे, संजय पाटील यांनी दिवसभर यासाठी ठाण मांडले होते. दिल्लीत याविषयी चर्चा होऊन राष्ट्रवादीच्या आवाहनास प्रतिसाद देण्याविषयी निर्णय झाल्याचे समजते. पक्षातील एका वरिष्ठ नेत्याने यास दुजोरा दिला आहे. अधिकृत घोषणा गुरुवारी रावसाहेब दानवे यांच्याकडून होण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेत सभापतींवरील अविश्वास ठरावावेळी राष्ट्रवादीने भाजपला मदत केल्यामुळे सध्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे सूर जुळले आहेत. त्यामुळेच राष्ट्रवादीला या निवडणुकीत सहकार्य करण्याची भूमिका घेतल्याचे समजते. (प्रतिनिधी)निवडणूक लढविण्याचा प्रस्ताव : घोरपडेअजितराव घोरपडे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, पोटनिवडणूक लढवावी, असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला आहे. आम्ही घेतलेली बैठक उघड होती. कार्यकर्त्यांच्या भावना आम्ही पक्षापुढे मांडल्या. पोटनिवडणूक लढवावी, असे कार्यकर्त्यांचे मत आहे. पक्षीय स्तरावर आता दिल्लीत याविषयीचा निर्णय होईल. आम्ही प्रतीक्षेत आहोत.
भाजपकडून पोटनिवडणूक बिनविरोधचे संकेत!
By admin | Published: March 18, 2015 11:52 PM