कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीच्या राजकीय हालचाली गतिमान होत असून, भाजपने सोमवारी सहा सदस्यांची निवडणूक समिती जाहीर केली. या समितीत माजी आमदार अमल महाडिक, महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांचा समावेश आहे.
महानगरपालिकेची निवडणूक माजी खासदार धनंजय महाडिक व देवस्थानचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली लढविण्याचा निर्धार भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केला. त्याचवेळी त्यांनी महेश जाधव यांना पुढील चार दिवसात निवडणूक समिती तयार करण्याची सूचना केली होती.
कोणत्या प्रभागात भाजप व ताराराणी आघाडीचे उमेदवार उभे करायचे, उमेदवार कोण असावेत, उमेदवारांची यादी कधी जाहीर करायची यासह निवडणुकीच्या अनुषंगाने जी तयारी करावी लागणार आहे, त्याची पूर्तता करण्याची जबाबदारी या समितीवर असणार आहे. ही समिती धनंजय महाडिक व महेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली काम करेल तर अंतिम निर्णय हा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व महादेवराव महाडिक घेणार आहेत.
समिती अशी
या समितीत भाजप महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे, माजी आमदार अमल महाडिक, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, महापालिकेतील माजी गटनेते विजय सूर्यवंशी, माजी महापौर सुनील कदम, ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम यांचा समावेश आहे. अमल महाडिक व सुनील कदम हे समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत.