कोल्हापूर : कोरोना लसीच्या पुरवठ्यावरून शुक्रवारी कोल्हापुरात शिवसेनेने दसरा चौकात शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर भाजपचा ‘महाराष्ट्रद्रोही’ असा उल्लेख करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात मुर्दाबाद, हाय हायच्या घोषणा दिल्या. लसीसाठी घाणेरडे, गलिच्छ राजकारण करणाऱ्या भाजपला महाराष्ट्र कदापिही माफ करणार नाही, असा इशाराही देण्यात आला.
जिल्हा शिवसेनाप्रमुख संजय पवार व विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली कोविड निर्बंधांचे पालन करीत मोजक्याच शिवसैनिकांच्या उपस्थितीत शुक्रवारी दुपारी दसरा चौकातील शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर अनोखे आंदोलन झाले. मोदी, फडणवीस, पाटील यांच्या प्रतिमांवर फुल्या मारलेला फलक हातात घेऊन भाजपच्या धिक्काराच्या जोरदार घोषणा दिल्या.
यावेळी बोलताना संजय पवार यांनी सत्तेपासून लांब गेल्यानेच भाजपने टीका करण्याचा धंदा सुरू केला आहे. केंद्र सरकारच्या मदतीने जाणीवपूर्वक ठाकरे सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोरोनाच्या पातळीवर चांगले काम करीत असताना त्यांना लस उपलब्ध करून देण्यासाठी मदत करण्याऐवजी भाजप यातही घाणेरडे राजकारण करीत आहे. महाराष्ट्राची ही राजकीय संस्कृती कधीच नव्हती. संकटकाळात विरोधी पक्ष म्हणून फडणवीस व चंद्रकांत पाटील यांनी मदत करण्यासाठी राज्याची बदनामी चालवली आहे. राज्यात राहून राज्याचा अपमान हा छत्रपती शिवाजी महाराज, १०५ हुतात्म्यांचा अपमान आहे. भाजपच्या या गलिच्छ प्रवृत्तीला अखंड महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही, अशीही टीका केली.
फोटो: ०९०४२०२१-कोल-शिवसेना आंदोलन
फोटो ओळ : कोल्हापुरात शुक्रवारी दुपारी जिल्हा शिवसेनेने लसीकरणावरून भाजपकडून सुरू असलेल्या राजकारणाचा रस्त्यावर उतरून निषेध नोंदवला. जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत दसरा चौक़ातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर भाजपच्या विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या.