कागल : मंत्री मुश्रीफ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. आपल्या सामाजिक कामामुळे राज्यभर पोहोचले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील आमच्या पक्षाचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. शरद पवारांचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. म्हणून भारतीय जनता पक्ष त्यांना बदनाम करण्यासाठी मोठे कट कारस्थान रचत आहे. ईडीची भीती घालत आहे. ईडीबीडीला घाबरून इतरांसारखे विचार बदलणारे हसन मुश्रीफ नव्हेत, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले.
राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेतील शेवटची सभा कागल येथे आज झाली. त्यामध्ये ते बोलत होते. कागल विधानसभा मतदारसंघ हा शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांचा सार आहे, असेही ते म्हणाले. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे, उपाध्यक्ष नवीद मुश्रीफ, सक्षणा सलगर, शीतल फराकटे, प्रवीणसिंह पाटील, वसंतराव धुरे, युवराज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, शरद पवार यांच्यावर निस्सीम प्रेम करणारा कागल मतदारसंघ आहे. त्यांच्या सभेसाठी पंचवीस हजार लोक हजर राहतील. या संवाद सभेत भय्या माने, मनीषा पाटील, सुकुमार शिंदे, शिवाजी पाटील, विजय सातवेकर, मदन पलंगे, अरूण व्हरांबळे, सचिन गुरव, वृषाली पाटील, सागर कोळी, सुनील भिऊगंडे, तोडकर आदींनी सूचना केल्या. संजय चितारी यांनी स्वागत केले. तालुकाध्यक्ष विकास पाटील यांनी प्रास्ताविक केले, तर प्रवीण काळबर यांनी आभार मानले.
कागलची सभा लकी
मंत्री जयंत पाटील म्हणाले की, गेल्या चार - पाच विधानसभा निवडणुकीत मी मंत्री मुश्रीफांच्या प्रचाराची सांगता करतो. ही सभा केली की, माझाही विजय पक्का होतो. आताही राज्यातील या संवाद यात्रेची शेवटची सभा कागलात करीत आहे. यामुळे ज्या उद्देशाने ही यात्रा काढली, तो उद्देश म्हणजे २०२४मध्ये राज्यात राष्ट्रवादी प्रथम क्रमांकाचा पक्ष बनणार, हे आता निश्चित झाले आहे.