लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दसऱ्याचा शिमगा करून टाकला, अशी घणाघाती टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली. ठाकरे यांच्या भाषणानंतर पाटील यांनी लगेच पत्रकार परिषद घेऊन ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.
पाटील म्हणाले, ठाकरे हे राज्यातील विविध प्रश्नांवर बोलतील अशी अपेक्षा होती. मात्र, त्यावर न बोलता त्यांनी केंद्राच्या नावाने शिमगा केला. शेतकरी, पूरग्रस्त यांच्याविषयी त्यांनी एक शब्दही काढला नाही. शिवसेनेला अचानक राम मंदिर आणि हिंदुत्व आठवत आहे. हे काहीतरी वेगळेच संकेत देत आहेत. स्वातंत्र्य लढ्यात संघ कुठे होता? असे मुख्यमंत्री म्हणाले. मात्र, असे विचारत असताना मुख्यमंत्र्यांना इतिहास माहिती असावा लागतो, स्वातंत्र्य काळात तुम्ही कुठे होता? असा सवालही पाटील यांनी केला.
शेतकऱ्यांच्या पॅकेजमधून रस्ते, धरणांसाठी पैसा
राज्यातील शेतकऱ्यांसाठी दहा हजार कोटीचे पॅकेज दिल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. मात्र, या दहा हजार कोटीमध्ये काय काय दिले? हे स्पष्ट केले नाही. रस्ते आणि धरण दुरुस्तीसाठीही यातूनच निधी दिला आहे अशी माहिती आहे. मात्र, शेतकऱ्यांना काय दिले? हे एकदा त्यांनी स्पष्टपणे सांगावे, असे आवाहनही पाटील यांनी केले.