कोल्हापूर : दिल्लीकरांना जर हात घातलाच तर विजयच मिळवावा लागतो. त्यामुळे ते तिसऱ्या जागेसाठी तयार नव्हते. परंतू मी आणि देवेंंद्र फडणवीस यांनी अभ्यास करून त्यांना शब्द दिला. ‘ये हमारा वादा है, इस सीट को जिताएंगे’ ही खात्री दिल्यानंतर त्यांनी धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली. आम्ही केवळ विजय मिळवला नाही तर संजय राऊत यांना सहाव्या क्रमांकावर नेऊन ठेवले असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना शनिवारी लगावला.
प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, विकासाची दृष्टी आणि उत्तम संघटन कौशल्य असलेले धनंजय महाडिक हे राज्यसभेचे खासदार झाल्यामुळे याचा पश्चिम महाराष्ट्राला फायदा होणार आहे. २०१९ नंतर विस्कटेलेले संघटन पुन्हा मजबूत करण्यासाठीही त्यांच्या या निवडीचा फायदा होईल. कोल्हापूर जिल्ह्यातील यापुढच्या महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपची ताकद दाखवू. कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत जिल्ह्यातील एकतर्फी वाटचालीला आम्ही ब्रेक लावणार होतो. परंतू ही लढत एकास एक झाली. तिरंगी झाली असती तर सीट आम्ही काढली असती. मात्र आता यापुढच्या निवडणुकांमध्ये भाजपची ताकद वाढलेली दिसेल.