अंजली निंबाळकर यांची बाजीबेळगाव : मराठी भाषिकांचे प्राबल्य असलेल्या बेळगाव जिल्ह्यात भाजपने एकूण १८ पैकी दहा जागा पटकावल्या, तर काँग्रेसनेदेखील आठ जागा मिळवित दबदबा कायम ठेवला. २०१३ च्या निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसला दोन जागांचा फायदा, तर एकीकरण समितीला दोन जागांचे नुकसान झाले आहे. भाजपला गतवेळी एवढ्याच जागांवर समाधान मानावे लागले.मंगळवारी टिळकवाडी येथील राणी पार्वती देवी कॉलेज येथे झालेल्या मतमोजणीत मातब्बरांना पराभवाचा सामना करावा लागला. बेळगाव उत्तरमधून भाजपच्या अनिल बेनके यांनी काँग्रेसच्या फिरोज सेठ यांचा १९ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. सेठ यांना ६१७९३ मते, तर अनिल बेनके यांना ७९०५७ मते पडली.बेळगाव दक्षिण मतदारसंघात भाजपच्या अभय पाटील यानी काँग्रेसच्या एम. डी. लक्ष्मी नारायण यांचा ६० हजार हून अधिक मताने पराभव केला. लक्ष्मी नारायण यांना २५८०६, तर समितीच्या प्रकाश मरगाळे आणि किरण सायनाक यांना प्रत्येकी २१५३७ आणि ८२९५ मते मिळाली. विजयी अभय पाटील यांनी ८४४९८ मते मिळविली.बेळगाव ग्रामीणमधून काँग्रेसच्या लक्ष्मी हेब्बाळकर यांनी भाजपच्या संजय पाटील यांना ५१ हजार मतांच्या फरकाने हरविले. लक्ष्मी हेब्बाळकर यांना एक लाख दोन हजार ४० मते पडली. तर संजय पाटील यांना ५०३१६ मिळाली. खानापुरात काँग्रेसच्या डॉ. अंजली निंबाळकर यांनी भाजपच्या विठ्ठल हलगेकर यांचा पाच हजार मतांनी पराभव केला. खानापूरचे समितीचे उमेदवार अरविंद पाटील वगळता समितीच्या सर्व उमेदवारांची अनामत जप्त झाली.चिकोडी-सदलगा येथे चुरशीच्या लढतीत गणेश हुक्केरी यांनी अण्णासाहेब ज्वोल्ले यांचा पराभव केला. गोकाकमधून पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी भाजपच्या अशोक पुजारी यांचा दहा हजार मतांनी पराभव केला. यमकनमर्डीतून माजी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी पाच हजार मतांनी भाजपच्या मारुती अष्टगी यांच्यावर निसटता विजय मिळविला. रमेश जारकीहोळी हे गोकाकमधून सलग पाचव्यांदा आमदार झाले. यमकनमर्डीतून सतीश जारकीहोळी हे तिसऱ्यांदा विधानसभेवर जात असून, ते दोनदा विधान परिषद सदस्यदेखील होते. अरभावीतून भाजपच्या तिकिटावर भालचंद्र जारकीहोळी यांनी मोठ्या फरकाने काँग्रेसच्या अरविंद दलवाई यांचा पराभव केला. अरभावीमधून भाजपच्या तिकिटावर तिसºयांदा भालचंद्र जारकीहोळी निवडून आले. यापूर्वी ते दोनदा जनता दल (निधर्मी) चे आमदार होते.अथणी येथे भाजपचे माजी मंत्री लक्ष्मण सवडी यांना पराभवाचा धक्का बसला. काँग्रेसच्या महेश कुठमळ्ळी यांनी त्यांचा पराभव केला. डीसीसी बँकेच्या राजकारणातून त्यांचा पराभव झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. रामदुर्गचे विद्यमान आमदार अशोक पट्टण यांनादेखील पराभवाचा सामना करावा लागला. अटीतटीच्या लढतीत भाजपचे महादेवाप्पा यादवाड यांनी पराभव केला. कागवाडमधून भाजपचे राजू कागे यांना काँग्रेसच्या श्रीमंत पाटील यांनी पराभूत केले. कुडचीमधून दुसºयांदा पी. राजीव आमदार झाले आहेत. २०१३मध्ये ते बीएसआर पक्षातून आमदार होते. राजीव यांनी माजी आमदार शाम घाटगे यांचे पुत्र शिव घाटगे यांचा पराभव केला. बैलहोंगल या लिंगायत बहुल मतदारसंघात काँग्रेसचे महांतेश कौजलगी यांनी विजय मिळविला. भाजपचे बंडखोर जगदीश मेटगुड यांना दुसºया क्रमांकाची मते मिळाली. सौंदत्ती मतदारसंघात भाजपच्या आनंद मामनी यांनी हॅट्ट्रिक केलीे. कित्तूरमध्ये भाजपच्या महांतेश दोड्डगौडर यांनी माजी मंत्री डी. बी. इनामदार यांचा पराभव केला.फिरोज सेठ यांची हुकली हॅट्ट्रिककाँग्रेसचे विद्यमान आमदार फिरोज सेठ यांना यावेळी पराभवाचा सामना करावा लागला. हिंदू मुस्लिम मतविभाजनाचा फटका सेठ यांना बसला आहे. निवडणूक प्रचारात पाकिस्तान जिंदाबाद घोषणा दिल्याचा आरोप झाला होता. त्यामुळे हिंदू मते एकवटली. परिणामी, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना कमी मते पडली. त्यानेच सेठ यांचा पराभव झाला. मागील दोन निवडणुकीत मतदारसंघात समितीच्या उमेदवाराने बºयापैकी मते मिळविली होती. मात्र, यावेळेस बेनके यांना मराठी आणि कन्नड दोन्ही भाषिकांनी साथ दिली आहे. १९५६ पासून झालेल्या निवडणुकीत केवळ समितीचेच उमेदवार निवडून येत होते. १९९९, २००४ साली काँग्रेसचे रमेश कुडची, तर २००८ आणि २०१३ मध्ये कॉंग्रेसचे फिरोज सेठ यांनी विजय मिळविला होता. त्यानंतर अनिल बेनेके यांच्या रूपात भाजपने पहिल्यांदाच उत्तर भागात कमळ फुलविले आहे.तीन महिला प्रतिनिधीजिल्ह्यातून शशिकला ज्वोल्ले,Þडॉ. अंजली निबाळकर, लक्ष्मी हेब्बाळकर या विधानसभेत गेल्या आहेत. २०१३ मध्ये फक्त ज्वोल्ले या एकमेव महिला प्रतिनिधी जिल्ह्यातून निवडल्या गेल्या होत्या.पत्नी विजयी,तर पती पराभूतनिपाणीतून भाजपच्या तिकिटावर शशिकला ज्वोल्ले दुसºयांदा आमदार झाल्या; पण त्यांचे पती अण्णासाहेब ज्वोल्ले यांना चिकोडी मतदारसंघातून पराभव स्वीकारावा लागला.खानापुरात दुहीचा फटकाआमदार अरविंद पाटील आणि विलास बेळगावकर यांच्यात मत विभागणी झाल्याचा फटका खानापुरात समितीला बसला असून, डॉ. अंजली निंबाळकर या सहा हजार मतांच्या फरकाने निवडून आल्या आहेत. विलास बेळगावकर यांना १७ हजार आणि अरविंद पाटील यांना २६ हजार मते पडली. दोघांच्या मत विभागणीचा नेमका फायदा काँग्रेसला झाला. भाजपचेदेखील बंडखोरीमुळे नुकसान झाले आहे. भाजपचे बंडखोर जोतिबा रेमाणी यांना दहा हजार, तर अधिकृत उमेदवार विठ्ठल हलगेकर यांना ३१ हजार मते मिळाली आहेत.दक्षिणेत भाजपला साथदक्षिण मतदारसंघात महाराष्ट्र एकीकरण समितीतील फूट, वाद, हेवेदावे यामुळे मतदारांनी भाजपला कौल देत ६० हजारांचे मताधिक्य अभय पाटील यांना मिळाले. समितीचे नेते मराठी मतांचे एकत्रीकरण करण्यात कमी पडले. परिणामी, मराठी मतदारांनी अभय पाटील यांना कौल दिला.
बेळगाव जिल्ह्यात भाजप, काँग्रेसला संमिश्र यश एकीकरण समितीचा धुव्वा : शहरात भाजप, ग्रामीण भागात काँग्रेसचे वर्चस्व,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 1:21 AM