कोल्हापूर : राष्ट्रवादीच्या माघारीनंतर आजरा साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी भाजप, काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र आले आहेत. आमदार विनय कोरे आणि आमदार सतेज पाटील यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आणि वारणानगर येथील पाच तासांच्या वाटाघाटीनंतर बुधवारी या आघाडीवर शिक्कामोर्तब झाले. शुक्रवार हा माघारीचा शेवटचा दिवस असून शेवटच्या टप्प्यात उर्वरित इच्छुकांची काय भूमिका राहणार आहे हे त्याच दिवशी स्पष्ट होणार आहे.सोमवारी मंत्री हसन मुश्रीफ, आमदार पाटील, आमदार कोरे यांनी विविध गटांच्या प्रमुखांशी चर्चा केली. परंतु यामध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला अपेक्षित जागा येत नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुश्रीफ यांची भेट घेऊन या निवडणुकीत आम्ही माघार घेणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे मंगळवारी दिवसभर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या तीनही नेत्यांच्या झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी माघारीवर ठाम असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर मात्र पाटील आणि कोरे यांनी आपापल्या संबंधित कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि एकत्रित आघाडी करण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार बुधवारी सकाळी दहा वाजता अशोक चराटी आणि जयवंतराव शिंपी यांच्यात आजऱ्यात बैठक झाली. ही बैठक आटोपून या दोघांसह विलास नाईक, जनार्दन टोपले, मलिक बुरूड, अभिषेक शिंपी, दशरथ अमृते यांच्यासह वारणानगर गाठले. या ठिकाणी कोरे यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. तोपर्यंत कारखान्याचे अध्यक्ष सुनील शिंत्रे, ‘गोकुळ’च्या संचालिका अंजना रेडेकर यांनी ठाकरे गटाचे संभाजी पाटील, युवराज पोवार यांच्यासह सतेज पाटील यांची भेट घेऊन संध्याकाळी वारणानगर येथे कोरे यांची भेट घेतली. या ठिकाणी पुन्हा तासभर चर्चा होऊन जागा वाटप निश्चित करण्यात आले.यानंतर कोरे यांचा निरोप घेऊन सर्वजण रात्री आठच्या सुमारास कोल्हापूरमध्ये आले आणि त्यांनी सतेज पाटील यांची अजिंक्यतारा येथे भेट घेतली. कोणी कोणत्या गटातून उभारायचेही याचे नियोजन झाले असून याबाबत अधिकृत घोषणा चराटी, शिंपी, शिंत्रे करतील असे सांगण्यात आले. दरम्यान, या सर्व कामामध्ये आमदार पाटील, कोरे यांच्यासह मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर यांचे सहकार्य मिळाल्याचे अशोक चराटी यांनी सांगितले.
नव्या आघाडीचे जागा वाटप
- अशोक चराटी गट १०
- जयवंतराव शिंपी गट ०४
- सुनील शिंत्रे गट ०३
- अंजना रेडेकर गट ०३
- उमेश आपटे ०१
जिल्हा बँकेकडून मदत होणारआजरा साखर कारखाना चालवण्यासाठी जिल्हा बँकेची गरज लागणारच आहे. परंतु शेतकऱ्यांच्या हितासाठी जिल्हा बँकेकडून मदत करण्यात आपण कुठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाही मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्याची माहिती सतेज पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
राष्ट्रवादीच्या माघारीने सात जणांना अधिकची संधीनेत्यांनी घेतलेल्या पहिल्या बैठकीत राष्ट्रवादीला सात जागा देण्यात आल्या होत्या. परंतु चराटी यांना आठ आणि सतेज पाटील यांच्या गटाला स्वतंत्र दिलेल्या जागा आणि त्यातही शिंपी गटाचा समावेश यामुळे राष्ट्रवादीमध्ये तीव्र नाराजी पसरली. परिणामी त्यांनी निवडणूक रिंगणातूनच माघार घेतली. त्यामुळे त्यांच्या वाटणीच्या ७ जागांवर आता इतर गटाच्या जादा कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे.
ऊसबिलासाठी ६० कोटी रुपये मंजूरजिल्हा बँकेने ऊस बिलासाठी ६० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले असून कारखान्याला पुरवठा होणाऱ्या उसाची बिले देण्यात कोणतीच अडचण आता नाही. त्यामुळे सभासद आणि शेतकऱ्यांनी मनामध्ये शंका न आणता कारखान्याला ऊस घालावा, असे आवाहन यावेळी अध्यक्ष सुनील शिंत्रे यांनी केले आहे.
आजरा कारखान्याची निवडणूक लागली आहे. ही लढाई अशी आहे की अडचणी कितीही आल्या तरी त्यातून माघार घेता येत नाही. कारण हा हजारो ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे आमदार विनय कोरे आणि मी मिळून ही आघाडी तयार केली आहे. कारखान्याची आर्थिक स्थिती पाहता ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठीच आम्ही हा निर्णय घेतला. इतरांनीही यासाठी सहकार्य करावे, असे मी आवाहन करतो. - सतेज पाटील, आमदार