कोल्हापूर : कर्तव्याचे भान ठेवत पुराचे पाणी थोडे कमी होताच तीन दिवस अहोरात्र मेहनत घेऊन बालिंगा पंपिंग स्टेशन येथील कर्मचाऱ्यांनी शहराचा पाणीपुरवठा सुरू केला. याची दखल घेत भाजपतर्फे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या सर्व कर्मचाऱ्यांचा मंगळवारी भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी खासदार धनंजय महाडिक, महेश जाधव, जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे उपस्थित होते. मंगळवारी सकाळी आमदार पाटील यांच्या सोबत भाजपा पदाधिकारी नागदेववाडी येथील उपसा केंद्रावर पोहोचले. माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांनी सत्कारामागील भूमिका सांगितली. या सर्व कर्मचाऱ्यांच्या अडचणी ऐकल्यानंतर आमदार पाटील यांनी या सर्व कर्मचाऱ्यांना बूट, हेल्मेट यासारख्या आधुनिक वस्तू व उपकरणांचा समावेश असलेले किट देणार असल्याची व विमा उतरवणार असल्याची घोषणा केली.
यानंतर सावित्रीबाई फुले हॉस्पिटल नजीकच्या कार्यालयातील महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अजित अस्वले, सहायक अभियंता विनायक पाटील व कर्मचारी तसेच भाजपचे सरचिटणीस विजय जाधव, दिलीप मेत्राणी, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, उपाध्यक्ष राजू मोरे, संजय सावंत, सचिन तोडकर, युवा मोर्चा अध्यक्ष विजय खाडे, महिला जिल्हाध्यक्षा गायत्री राऊत, विशाल शिराळकर, अमर जत्राटे, धनश्री तोडकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.