कोल्हापूर : पुलवामा येथील हल्ल्यातील शहीद जवानांना आदरांजली वाहण्यासाठी भाजपतर्फे रविवारी बिंदू चौकात आयोजित कार्यक्रमानंतर दोन पदाधिकाºयांमध्ये चांगलीच जुंपली. शहरातील या दोन पदाधिकाºयांमध्ये बघता बघता शाब्दिक वाद होऊन, पक्षात कोणाला किती व काय मिळाले? इथपर्यंत तो वाद गेला. इतर उपस्थित पदाधिकाºयांनी यामध्ये हस्तक्षेप करून हा वाद मिटविला.
शहीद जवानांना आदरांजली वाहण्यासाठी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या ठिकाणी पक्षाचे प्रमुख नेते हे आदरांजली वाहण्यासाठी आले. त्यांनी पुष्पांजली अर्पण करून उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकाºयांसमवेत बसून काही वेळ संवाद साधला. यानंतर हे प्रमुख नेते निघून गेले. त्यानंतर या चर्र्चेतील संवादाचे रूपांतर दोन प्रमुख पदाधिकाºयांच्या शाब्दिक बाचाबाचीत झाले. पक्षात कोणाला काय आणि किती मिळाले? इथपर्यंत हा वाद गेला. शासनाचे पद असलेल्या प्रमुख पदाधिकाºयाने आम्ही पक्षासाठी अनेक कष्ट उपसल्यानेच आम्हाला पदे मिळाली आहेत. त्यावर कशाला चर्चा करता? घरात येऊन बघा, आम्ही काही मिळविलेले नाही, हे देवीची शपथ घेऊन सांगतो. त्यावर दुसºया प्रमुख पदाधिकाºयाने आम्ही नेत्यांसमोर फक्त आमचा विषय बोललोय, तुमचे नाव घेतलेले नाही, असे उत्तर दिले. यामुळे हा शाब्दिक वाद वाढत गेला. इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यामुळे अवाक् झाले. काहींनी यामध्ये हस्तक्षेप करून या वादावर पडदा टाकला.