कोल्हापूर : टाटा समुहाने पुढाकार घेतलेला उद्योग महाराष्ट्रातून गुजरातला गेला, त्याची काळजी राज्य सरकारला वाटत नाही. या सरकारचा सगळा वेळ आपले आमदार सांभाळण्यातच जात आहे, त्यांना महाराष्ट्राच्या प्रश्नाकडे पाहायला वेळ मिळत नाही, अशी टीका माजी मंत्री जयंत पाटील यांनी रविवारी रात्री पत्रकारांशी बोलताना केली.
माजी मंत्री पाटील सहकुटुंब अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आले होते, त्यावेळी पत्रकारांशी ते बाेलत होते. राज्यातील प्रकल्प गुजरातला गेला. तो थांबविण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला नाही. दिल्लीला हे सरकार घाबरते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्री या सर्वांनी अहमदाबादला जाऊन गेलेला उद्योग परत आणायला पाहिजे होता. टाटाचा उद्योग गेल्याने त्याचे दुष्परिणाम महाराष्ट्रात दिसणार आहेत, असे पाटील म्हणाले.
गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. या निवडणुकीत सत्ता जाईल, अशी भीती भाजपला वाटत आहे. त्यामुळे देशात काहीही आले तरी ते गुजरातमध्ये ओढून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यात महाराष्ट्राचे नेतृत्व बळी पडत आहे. एखादा प्रकल्प जातोय म्हटल्यावर जो संताप, थयथयाट करायला पाहिजे तो केला नाही. त्यामुळे पुढील काळातही आणखी काही प्रकल्प जातील, अशी भीती पाटील यांनी व्यक्त केली.
आमदार रवी राणा यांनी आमदार बच्चू कडू यांच्यावर केलेल्या आरोपाबाबत विचारले असता, हे आरोप फारच गंभीर आहेत. राणा यांच्या आरोपमुळे कडू यांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यांनी आता आपला बाणा दाखविला पाहिजे, असे ते म्हणाले.