कोल्हापूर: भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी १०० कोटींच्या घोटाळ्याच्या केलेल्या आरोपानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेऊन सोमय्यांचे सगळे आरोप फेटाळले आहेत. माझ्यावर आणि जावयांवर करण्यात आलेले आरोप बिनबुडाचे असून मला तर सोमैय्यांच्या सीए पदवीवरच शंका येतेय, असा टोला मुश्रिफ यांनी लगावला. मी त्यांना कोल्हापुरात येण्यापासून अडवलं नाही, तर कायदेशीर प्रक्रियेचा भाग, आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, म्हणून त्यांना पोलीस प्रशासनाने स्थानबद्ध केलं होतं. मी एकेदिवशी त्यांना कारखान्याचं पर्यटन आवर्जून करवतो, असेही मुश्रीफ यांनी म्हटलं.
माझ्यावर सातत्याने होत असलेल्या आरोपाच्या मागे भाजपचं मोठं षडयंत्र असून याचे मास्टरमाईंड हे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आहेत. पाटील ज्या प्रदेशाचं प्रतिनिधित्व करतात, तेथे भाजपा भुईसपाट झालीय आणि ती मीच भुईसपाट केलीय. मला भाजपाकडून वारंवार ऑफर देण्यात आल्या. पण, मी पवार एके पवार अशी भूमिका घेतल्यानेच जाणीवपूर्वक हे कट कारस्थान करण्यात येत असल्याचं मुश्रिफ यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं.
हसन मुश्रीफ यांच्या आरोपानंतर चंद्रकांत पाटील यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे. कायद्याची लढाई कायद्यानं लढा. कायद्याची लढाई कोल्पारी चपलेनं लढू नका, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ईडीची लढाई लढताना तोंडाला फेस येईल, असा टोला देखील चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. पॅनिक होऊन काय होत नसतं. शांत डोक्यानं काम करायचं असतं, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे. माझं नाव घेतल्याशिवाय मुश्रीफांना झोप लागत नाही, अशी टीका देखील चंद्रकांत पाटलांनी केली आहे.
१०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार
किरीट सोमय्या यांनी संपूर्ण माहिती घेऊन भाष्य करावं. त्यांनी केलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत. सोमय्यांच्या आरोपाने भाजपाची प्रतिमा मलिन होतेय. किरीट सोमय्यांनी हवी तिथं खुशाल चौकशी करावी. महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठीच भाजपाकडून वारंवार आरोप लावले जात आहेत. सोमय्यांना कारखान्याचं नाव सुद्धा वाचता येत नाही. आयकर विभागाने दोन वर्षापूर्वीच चौकशी केली आहे. किरीट सोमय्यांना काहीही माहिती नाही, कुठलेही पुरावे नसताना आरोप केल्यामुळे १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा कोर्टात दाखल करणार असल्याचा इशारा मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला आहे.