कोल्हापूर : “उद्धव आणि राज ठाकरे यांच्यात आग लावणाऱ्या संजय राऊत यांची आता छत्रपतींच्या घरातही आग लावण्यापर्यंत मजल गेली,” असा आरोप भाजपचे आमदार नितेश राणे Nitesh Rane यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना केला. यावेळी सचिन तोडकर, अभिषेक कोल्हापुरे, निखिल लटोरे उपस्थित होते.
“राऊत यांचा आग लावण्याचा धंदा आहे. उद्धव आणि राज यांच्यात त्यांनीच भांडणे लावली. त्यानंतर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी राऊतांची गाडीही जाळली होती. या दोन भावांमध्ये भांडणे लावल्यानंतर आता ते छत्रपती घराण्यातही आग लावत आहेत. दहा मिनिटे त्यांचे सुरक्षा रक्षक बाजूला काढा आणि मग मराठा समाजाने त्यांचा ताबा घेतला पाहिजे,” असंही राणे म्हणाले.
अयोध्येला जाणार म्हणणाऱ्या फक्त लहान मुलांची काळजी घेतली पाहिजे, असा टोला त्यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना लगावला. अतिक्रमणाबाबत मुंबई महापालिकेची नोटीस मिळाली आहे. कायदेशीर उत्तर देऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांवर निशाणा“पाठित खंजीर खुपसून, देवेंद्र फडणवीसांना फसवून नगरपालिका असेल किंवा राज्यात सत्तेत लोक बसले आहेत. सेना भाजपचं सरकार सत्तेत येईल, त्याला तुम्ही मोदींचा फोटो लावा, तुमचा फोटो लावा आणि एकत्र राज्य आणू असा शब्द उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना दिला. सत्ता आल्यानंतर शब्द न पडू देणारे मुख्यमत्री राज्यात बसलेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीनं ते मुख्यमंत्री झाले आणि अडीच वर्ष ते राज्य करतायत,” असं ते म्हणाले.
एका पत्रकारानं मला विचारलं अडीच वर्ष झालेत, कसं वाटतंय. एका चपट्या पायाच्या माणसाचे अडीच वर्ष झालेत, म्हणजेच महाराष्ट्राला पनवती लागून अडीच वर्षे झाली इतकंच विश्लेषण या सरकारचं करेन असं त्यांना सांगितल्याचं राणे सांगलीतील एका सभेदरम्यान म्हणाले.