कोल्हापूर : पश्चिम बंगाल मध्ये विधानसभा निवडणूक निकाल लागल्यानंतर हिंसाचार सुरू आहे. हा तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांनी घाबरवण्यासाठीचा हा प्रकार असल्याचा आरोप करीत देशभरात निदर्शने सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापुरातील निवासस्थानाबाहेर भाजपच्या वतीने बुधवारी निदर्शने करण्यात आली. या निदर्शनांमध्ये स्वतः आमदार पाटील सहभागी झाले होते.देशातील चार राज्यांबरोबर पश्चिम बंगाल मध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या. यात आसाममध्ये भारतीय जनता पार्टी, केरळमध्ये डावे, तामिळनाडूमध्ये डीएमके आणि पुदुचेरीमध्ये भाजपा यांनी यश मिळवले. येथे निवडणुका नंतर सर्व वातावरण शांत आहे. मात्र, पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू आहे. येथे तृणमूल काँग्रेसने २०० जागा मिळवल्या. त्यात २ कोटी ७६ लाख मते पडली, तर भारतीय जनता पार्टीला ७८ जागांवर विजयमिळाला आहे
केवळ ४० लाख मतांचा फरक पडला. तिथे भारतीय जनता पार्टीचे विचार रुजवणारे हजारो कार्यकर्ते या निवडणुकीत राबत होते. त्या कार्यकर्त्यांनी यापुढे भाजपाचे विचार येथे रुजवू नयेत, याकरिता त्यांना घाबरवण्यासाठी हा हिंसाचार सुरू आहे, असा आरोप करीत भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक कार्यकर्त्यांसह स्वतः प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वतःच्या निवासस्थानाबाहेर पश्चिम बंगालमधील तृणमूल सरकारच्या व ममता बॅनर्जी यांच्या निषेधार्थ बुधवारी सकाळी निदर्शने केली. यावेळी जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, शंतनु मोहिते, अक्षय निरुखेकर, सिद्धार्थ तोरस्कर, कृष्णा अथवाडकर उपस्थित होते .