कोल्हापूर : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी रविवारी भाजपच्यावतीने बिंदू चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली.भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी महावसुली सरकारचा तीव्र निषेध करणाऱ्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. 1 00 कोटी माझे.....आता नाहीत वाझे माझे, महा वसुली सरकारचा धिक्कार असो, गृहमंत्री राजीनामा द्या, अनिल देशमुख हे गृहमंत्री की....वसुली मंत्री, अनिल देशमुख यांचा धिक्कार असो, ठाकरे सरकार चले जाओ, आता तर हे स्पष्ट आहे......ठाकरे सरकार भ्रष्ट आहे असे फलक घेऊन कार्यकर्ते घोषणा देत होते.भाजपा सरचिटणीस हेमंत आराध्ये, अजित ठाणेकर, विजय जाधव, विजय जाधव, अशोक देसाई यांनी हा घडलेला प्रकार म्हणजे फक्त हिमनगाचे टोक असून यापुढे देखील असा प्रकारचा भ्रष्टाचार समोर येणार आहे. याप्रकरणात सचिन वाझे यांची नार्को टेस्ट घेऊन यामधील सर्व मंत्री, अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
वीज तोडणीसाठी सर्वसामान्य जनतेच्या दारात जातात आणि १०० कोटीचा भ्रष्ट्राचार करणा-या मंत्र्याची पाठराखण या महाराष्ट्रात होत असेल तर ही खरोखरच निंदनीय गोष्ट आहे. वीज तोडणी प्रश्नी यापुढे जर वीज तोडणीसाठी महावितरणचे कर्मचारी येत असतील तर त्याला जाब विचारून प्रसंगी भारतीय जनता पार्टी संघर्ष करण्यात मागे हटणार नाही तसेच काल एका व्यक्तीने वीज तोडणी करायला महावितरण चे लोक आले असता आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला अशा पद्धतीने जर कोणी दगावले तर याची संपूर्ण जबाबदारी महाविकास आघाडी सरकारची असेल, असे राहुल चिकोडे यांनी सांगितलेयावेळी सरचिटणीस दिलीप मेत्राणी, उपाध्यक्ष चंद्रकांत घाडगे, मारुती भागोजी, संजय सावंत, संतोष भिवटे, राजू मोरे, अमोल पालोजी, विजय अग्रवाल, सचिन तोडकर, प्रदीप उलपे, मंडल अध्यक्ष संतोष माळी, भरत काळे, प्रदीप पंडे, ओंकार खराडे, राहुल पाटील, विजय खाडे, उपस्थित होते.