कोल्हापूर : बारा आमदारांच्या निलंबन केल्याच्या निषेर्धात भाजपच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले.
भाजपा शहर व जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. भाजपा ग्रामीण संघटन सरचिटणीस नाथाजी पाटील म्हणाले, झालेली ही कारवाई लोकशाहीला काळिमा फासणारी आहे. जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे म्हणाले, जनतेची दिशाभूल करणारे हे अधिवेशन असून विरोधी पक्षातील सक्षम नेतृत्व अकार्यक्षम सरकारचा पाढा विधानसभेत वाचून या आखाड्यातदेखील आपल्याला धोबीपछाड करेल या भीतीने हे षडयंत्रच रचले गेले.
या वेळी सरचिटणीस विजय जाधव, अशोक देसाई, हेमंत आराध्ये, भगवान काटे यांनी आमदारांच्या निलंबनाबद्दल आपल्या मनोगतामध्ये तीव्र निषेध नोंदवला. यानंतर शिष्टमंडळाच्या वतीने उपजिल्हाधिकारी भाऊसो गलांडे यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी सरचिटणीस दिलीप मेत्राणी, विठ्ठल पाटील, गणेश देसाई, उपाध्यक्ष चंद्रकांत घाटगे, संजय सावंत, राजू मोरे, जिल्हा ग्रामीणचे हंबीरराव पाटील, महेश मोरे, शरद महाजन, सचिन पाटील, दीपक शिरगावकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
०६०७२०२१ कोल बीजेपी ०१
भाजपच्यावतीने बारा आमदारांच्या निलंबनाच्या निषेर्धात निदर्शने करून निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाे गलांडे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी डावीकडून हेमंत आराध्ये, राहुल चिकोडे, विजय जाधव, दिलीप मैत्राणी, नाथाजी पाटील, अशोक देसाई, गणेश देसाई उपस्थित होते.