कोल्हापूर : दडपशाही, लोकशाही आणि धर्म-जात यावर हल्ला करून ‘फोडा, झोडा आणि राज्य करा’ ही ब्रिटिशांचीच भूमिका घेऊन भाजप देशावर राज्य करत आहे, तेव्हा भाई, सावध व्हा, असा इशारा ज्येष्ठ विचारवंत दिल्ली येथील डॉ. अशोक ढवळे यांनी रविवारी दिला. अध्यक्षीय भाषणात डॉ. आनंद मेणसे यांनी भाजपची वाटचाल मनुस्मृतीकडेच सुरू असल्याची टीका केली.श्रमिक प्रतिष्ठान कोल्हापूर आयोजित 'लोकशाही वाचवा' या कॉम्रेड अवी पानसरे व्याख्यानमालेचा समारोप रविवारी झाला. ‘भाई, सावध व्हा’ या विषयावर डॉ. ढवळे बोलत होते. अध्यक्षस्थानी बेळगाव येथील ज्येष्ठ विचारवंत डॉ. आनंद मेणसे होते.डॉ. ढवळे म्हणाले, गेल्या दहा वर्षांत शेतकऱ्यांना कोणतीही कर्ज फी केंद्र सरकारने दिली नाही, याउलट या काळात मूठभर बड्या उद्योजकांचे १५ लाख कोटींची कर्जमाफी दिली. नोटाबंदी, कोविडकाळातील भय, असे अनेक विषय मांडून जनतेच्या उपजीविकेवर या सरकारने हल्ले केले आहेत, असा आरोप डॉ. ढवळे यांनी केला.
अध्यक्षीय भाषणात डॉ. मेणसे म्हणाले, आपला मुख्य शत्रू जो आहे, त्याला ओळखण्यास कमी पडू नका. हा शत्रू अनेक अंगांनी घराघरात पोहोचला आहे, त्याच्याशी मुकाबला करण्याची रणनीती आखली पाहिजे. संविधान आम्ही मानतो असे भाजप म्हणत असेल तरी त्यांचा व्यवहार मनुस्मृतीला धरून आहे हे लक्षात घेऊन सावध व्हा, असे आवाहन त्यांनी केली आहे. कृष्णात स्वाती यांनी प्रास्तविक केले. सानिया पठाण हिने परिचय करून दिला. रेश्मा खाडे हिने आभार मानले.
ईडी म्हणजे एकनाथ, देवेंद्र सरकारडॉ. ढवळे यांनी महाराष्ट्रातील सत्तारूढ सरकारची खोके सरकार आणि ईडी सरकार अशी ओळख झाल्याचे सांगून दुसरी ओळख ईडी म्हणजे ‘एकनाथ शिंदे, देवेंद्र सरकार’ अशी झाल्याचे सांगितले.