कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी पाठिंब्यासंदर्भात भाजप व शिवसेनेच्या स्थानिक पातळीवरील नेत्यांमध्ये बोलणी सुरू आहेत. शनिवारी भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह आमदारांशी संपर्क साधून एकत्र येण्यासंदर्भात प्रयत्न सुरू केले. याबाबत प्राथमिक चर्चा झाली असून, ही बोलणी सुरूच राहणार आहे. बुधवारी (दि. १) पालकमंत्री चंद्रकांतदादा यांच्या उपस्थितीत शिवसेना व भाजप आघाडीच्या नेत्यांची बैठक होऊन पुढील निर्णय होणार आहे.जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निकालानंतर कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. कॉँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीसह भाजप मित्रपक्षांकडून सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. कॉँग्रेस-राष्ट्रवादीकडे सर्वांत जास्त संख्याबळ असले तरी ते सत्तेपर्यंत पोहोचू शकत नाहीत. त्या खालोखाल भाजप मित्रपक्षांचे बलाबल आहे. त्यामुळे या दोघांचेही भवितव्य शिवसेनेच्या पाठिंब्यावर अवलंबून आहे. हा पक्ष कोणाच्या बाजूने राहणार यावरच सत्ता कोणाच्या ताब्यात जाणार हे ठरणार आहे. त्यामुळे दोन्हीकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपने आपला जुना मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेशी चर्चा करायला सुरुवात केली आहे. शनिवारी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह सर्व आमदारांशी संपर्क साधून प्राथमिक बोलणी केली. शिवसेना-भाजप एकत्र येण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. ही चर्चा सुरूच राहणार असून, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (दि. १) होणाऱ्या बैठकीत अंतिम निर्णय होणार आहे. या बैठकीला शिवसेना, भाजप, जनसुराज्य शक्ती पक्ष, ताराराणी आघाडीचे नेते उपस्थित राहणार आहेत.
जिल्हा परिषदेत भाजप-शिवसेना एकत्र येण्यासाठी प्रयत्न सुरू असून शिवसेनेच्या नेत्यांशी सकारात्मक चर्चा सुरू आहे. एकदा बैठक झाल्यानंतर या घडामोडींना आकार येवू शकेल.- आमदार सुरेश हाळवणकर