कोल्हापूर जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये भाजप-शिवसेनेची ताकद वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2023 05:04 PM2023-05-08T17:04:25+5:302023-05-08T17:04:59+5:30
जिल्ह्यात काॅंग्रेस व राष्ट्रवादी काॅंग्रेसने दबदबा कायम राखला असला तरी तडजोडीच्या भूमिकेने त्यांचे नुकसान झाले
राजाराम लोंढे
कोल्हापूर : ‘कोल्हापूर’,’ गडहिंग्लज’, ‘जयसिंगपूर’ बाजार समित्यांच्या निवडणुकीत जिल्ह्यात काॅंग्रेस व राष्ट्रवादी काॅंग्रेसने दबदबा कायम राखला असला तरी तडजोडीच्या भूमिकेने त्यांचे नुकसान झाले आहे. भाजप-शिवसेनेने (शिंदे गट) चांगलीच मुसंडी मारली आहे. तिन्ही समित्यांमधील ५४ पैकी महायुतीची तब्बल २२ सदस्य संख्या झाल्याने सहकारी संस्थांमध्येही त्यांनी पाय रोवण्यास सुरुवात केली आहे.
जिल्ह्यातील तीन बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये गडहिंग्लज बाजार समितीची निवडणूक बिनविरोध झाली. येथे राष्ट्रवादी काॅंग्रेस, भाजप, काॅंग्रेस, शिवसेना (दोन्ही गट), जनता दल असे अर्धा डझन पक्ष कार्यरत होते. तरीही बाजार समितीच्या आर्थिक परिस्थितीचे कारण पुढे करत सर्वच नेत्यांनी सयंमाची भूमिका घेतली.
या बाजार समितीचे गडहिंग्लज, चंदगड, आजरा व कागल (अर्धा) असे साडे तीन तालुक्यांचे कार्यक्षेत्र आहे. विकास संस्थांच्या पातळीवर चारही तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद आहे. तरीही समझोत्याच्या राजकारणात विकास संस्था व ग्रामपंचायत गटात केवळ चार जागा मिळाल्या. येथे भाजपला ६ तर काॅंग्रेसला तीन जागा मिळाल्या. हमाल-तोलाईदार व व्यापारी गटातील दोन जागा राष्ट्रवादीला मिळाल्याने त्यांची संख्या सहापर्यंत पोहोचते.
जयसिंगपूर बाजार समितीत बिनविरोधचा प्रयत्न फसला तरी सर्वपक्षीय मोट बांधली होती. भाजपच्या एका गटाने दंड थोपटल्याने झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना सात, काॅंग्रेसला पाच, स्वाभिमानी व शिवसेना (ठाकरे गट), भाजपला प्रत्येकी दोन जागा मिळाल्या.
कोल्हापूर बाजार समिती येथे राजकीय सोयीसाठी झालेल्या आघाडीविरोधात भाजप, चंद्रदीप नरके, सत्यजीत पाटील-सरुड, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, राहुल देसाई यांनी झुंज दिली. विरोधकांना अपेक्षित यश मिळालेले नसले तरी संस्थात्मक ताकद नसतानाही त्यांनी घेतलेली मते आत्मचिंतन करायला लावणारी आहेत.
समझोत्याचे राजकारण
सार्वत्रिक निवडणुकीत एकमेकांविरोधात शड्डू ठोकणाऱ्या जिल्ह्यातील नेत्यांनी ‘कोल्हापूर’, ‘जयसिंगपूर’ व ‘गडहिंग्लज’ बाजार समित्यांच्या निवडणुकीत समझोत्याचे राजकारण केले. राज्यातील अस्थिर परिस्थितीमुळे कोण कोणाला अंगावर घेण्यास तयार नसल्याने प्रत्येकाने सावध भूमिका घेतली.