विश्र्वास पाटील:कोल्हापूर : गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपचा सपाटून पराभव व्हावा, अशी माझी इच्छा असून गुजरातच्या जनतेने त्यांना चांगलाच धडा शिकवावा, असे खासदार राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. सोमवारी येथे पत्रकारांशी अनौपचारिक बोलताना त्यांनी भाजपबद्दलची ही ‘सदिच्छा’ व्यक्त केली. या निवडणुकीत मी कोणत्याच पक्षाच्या प्रचारास जाणार नसल्याचे त्यांनी सांगून टाकले.
एकेकाळी ‘भाजपचा सर्वांत विश्वासार्ह मित्र ते टोकाचा विरोधक’ अशी खासदार शेट्टी यांची गेल्या तीन वर्षांतील वाटचाल झाली आहे. विधानसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांनी शेट्टी यांची ‘माझे जिवलग मित्र’ अशी ओळख करून दिली होती; परंतु तेच शेट्टी आता पंतप्रधानांसह भाजपवर तिखट शब्दांत टीका करू लागले आहेत. भाजपवर तोंडसुख घेण्याची एकही संधी ते सोडत नाहीत.
ते म्हणाले,‘नागपूरला हिवाळी अधिवेशनावर काँग्रेसतर्फे मोर्चा काढण्यात येणार असून त्यामध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिले आहे; परंतु मी त्यामध्ये सहभागी होणार नाही. शेतकºयांच्या हितासाठी लढणाºया कोणत्याही पक्षाला माझा पाठिंबा असेल. त्यामुळे काँग्रेसच्या या मोर्चाला माझा पाठिंबा राहील. आजपर्यंत कोणत्या पक्षाने फसवणूक केली नाही तेवढी फसवणूक भाजप सरकारने केली आहे. ज्या पक्षाने मला दुखावले, त्यांचा पराभव निश्चित आहे. गुजरातची जनताही त्यांना याबाबत निश्चितच उत्तर देईल. गुजरात निवडणुकीत मी कोणत्याच पक्षाच्या प्रचाराला जाणार नाही.