कोल्हापूर : टोलचे भूत जनतेनेच आंदोलन करून गाडले आहे; त्यामुळे भाजपने टोल रद्द केला म्हणून श्रेय घेण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया ‘भाकप’चे ज्येष्ठ नेते दिलीप पवार यांनी दिली. ‘भाजप’चे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये टोल आणणारे विजयी आणि टोल घालविणारे पराभूत झाल्याची खंत व्यक्त केली. त्यांच्या या विधानावर विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दिलीप पवार यांनी त्यांच्या विधानाचा खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे.पवार म्हणाले, ‘टोल घालविला असे सांगून भाजपने श्रेय घेण्याचे योग्य नाही. जर श्रेय द्यायचेच असेल, तर प्रा. एन. डी. पाटील, ज्येष्ठ कामगार नेते अॅड. गोविंद पानसरे, माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांना दिले पाहिजे. कोल्हापूरकरांच्या पाठीशी राहत त्यांनी आंदोलनाची धार कायम ठेवली.
सलग सात वर्षे आंदोलन सुरू ठेवले. या दरम्यान, आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले. टोल रद्द केल्यानंतर गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. पाच वर्षे झाली तरी गुन्हे मागे घेतलेले नाहीत; त्यामुळे आंदोलनाच्या रेट्यामुळेच सरकारला टोल रद्द करणे भाग पडले; त्यामुळे भाजपने याचे राजकारण करू नये.