कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाची प्रदेश कार्यकारिणी बैठक व राज्य परिषद शुक्रवार (दि. २२) ते रविवार (दि. २४) या कालावधीत कोल्हापुरात होत आहे. त्याची जय्यत तयारी कार्यकर्त्यांकडून सुरू आहे. शिवाजी पेठेतील पेटाळा मैदानावर भव्य मंडप उभारण्याचे काम सुरू असून, पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. सोमवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मैदानावर जाऊन तयारीची पाहणी केली.प्रदेश कार्यकारिणी बैठक व राज्य परिषदेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्यासह राज्यातील मंत्री, राज्यमंत्री, पक्षाचे आमदार, प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य येणार आहेत.याची जय्यत तयारी सुरू असून पेटाळा मैदानावर सुमारे बारा हजार लोक बसतील इतक्या क्षमतेचा भव्य मंडप उभारला जात आहे. ऊन-पावसापासून संरक्षण होण्यासाठी या मंडपावर पत्रे टाकण्यात येत आहेत. या शेजारीच खास निमंत्रित आमदार, खासदार व प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी वातानुकूलित बंदिस्त मंडप उभारण्यात आला आहे. त्याची क्षमता एक हजार लोकांची आहे. सोमवारी पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले. महाराष्ट्र हायस्कूल येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे, तर ‘विशेष निमंत्रितां’साठी राम गणेश गडकरी हॉलसमोर भोजन व्यवस्थेसाठी मंडप उभारण्यात येत आहे. या हॉलसमोरच विशेष निमंत्रितांच्या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था केली आहे. इतर वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था गांधी मैदानावर असेल. प्रवेशद्वाराजवळ पत्रकार कक्ष, वैद्यकीय कक्ष व विदर्भ, कोकण, मराठवाडा व मुंबई येथील कार्यकर्त्यांसाठी चौकशी कक्ष उभारण्यात येत आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सकाळी भेट देऊन तयारीची पाहणी केली. त्यांच्यासमवेत महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव, अशोक देसाई, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता रेसिडेन्सी क्लब येथे ७३ प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. शनिवारी सकाळी १०.३० वाजता प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीचे उद्घाटन होणार आहे. दुपारी २ वाजेपर्यंत पहिले सत्र सुरू राहणार आहे. दुपारी ३ वाजता दुसरे सत्र होणार आहे. रविवारी शेवटच्या दिवशी सकाळी ९.३० ते १२.३० या वेळेत पहिले सत्र होऊन समारोप होणार आहे.
भाजप राज्य परिषदेची जोमात तयारी
By admin | Published: May 19, 2015 12:46 AM