कोल्हापूर : माणुसकीच्या भावनेतून मला पाठिंबा देण्याची विनंती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना केली होती. मात्र त्यांनी भाजपकडून लढण्यास सांगितले. स्वर्गीय चंद्रकांत जाधव यांनी खांद्यावर घेतलेला झेंडा कदापि अर्धवट सोडणार नाही. पाटील यांनी मनाचा मोठेपणा दाखवला नसल्याची खंत महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी व्यक्त केली.
चंद्रकांत जाधव हे आमदार म्हणून विजयी झाल्यापासून महापूर, कोरोना काळात केलेले काम व अकाली निधनाने त्यांची काढण्यात आलेली अंत्ययात्रा हे चित्रफितीच्या माध्यमातून सभागृहात दाखवण्यात आले. ते पाहून जयश्री जाधव यांचा व्यासपीठावरच अश्रूंचा बांध फुटला आणि सारं सभागृह भावूक झाले.
जाधव म्हणाल्या, चंद्रकांत जाधव यांनी आजारपणाकडे दुर्लक्ष करुन समाजाच्या प्रश्नाकडे अधिक लक्ष दिले. दवाखान्यात उपचार घेत असतानाही शहरातील प्रश्नांसाठी ते सतत फोन करत होते. डॉक्टरांनी दोन महिने विश्रांतीचा सल्ला दिला असताना जनतेच्या सेवेसाठी पंधरा दिवसात ते बाहेर पडले आणि काळाने त्यांच्यावर घाला घातला. त्यांच्या अकाली जाण्याने आमचे कुटुंब उद्ध्वस्त झाल्याने पुन्हा राजकारण करायचे नाही, असे ठरवले होते. मात्र त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांसाठी निवडणुकीला सामोरे जावे लागत आहे. कोल्हापूर शहर मॉडेल करण्याचे स्वप्न चंद्रकांत जाधव यांनी बघितले होते, ते पूर्ण करण्यासाठी मला साथ द्या.
तर तुम्हाला धैर्यशील खासदार दिसला नसता
जयश्री वहिनी तुमच्यात माझी आई बघतोय, खासदार बाळासाहेब माने अचानक निघून गेल्यानंतर माझ्या आईसमोर अंधार पसरला होता; पण खंबीरपणे त्या बाहेर पडल्या, लढल्या म्हणूनच आज तुम्हाला धैर्यशील माने खासदार दिसतो, असे धैर्यशील माने यांनी सांगितले.
चंद्रकांत पाटील माणुसकी विसरले
जाधव कुटुंबाने भाजपला साथ दिली, मात्र त्यांच्यावर आघात झाल्यानंतर खरे तर चंद्रकांत पाटील यांनी बिनविरोध करायला हवे होते. अडीच वर्षानंतर जी काही लढाई करायची केली असती तर कोणी वाईट म्हटले नसते, मात्र पाटील हे माणुसकी विसरल्याची टीका भारती पोवार यांनी केली.