लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांचे मूळ गाव असलेल्या खानापूर (ता. भुदरगड) ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले असून, तिथे शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या गटाची सत्ता आली आहे. प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या गटाला नऊपैकी दोन जागांवर समाधान मानावे लागले.
कोल्हापूर - गारगोटी रस्त्यावर गारगोटीच्या अलिकडे एक किलोमीटरवर हे सुमारे साडेचार हजार लोकवस्तीचे गाव आहे. याठिकाणी एकूण ३ हजार मतदार आहेत. येथील नऊ जागांसाठी निवडणूक झाली. यामध्ये शिवसेनेच्याविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपचा स्थानिक गट एकत्र आला होता. अखेर निवडणूक निकालानंतर शिवसेनेला सहा, भाजपला दोन, काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागले. आमदार पाटील यांचे गावात कमी वास्तव असले तरी त्यांचा गावांशी चांगला संपर्क आहे. सत्तेत असताना त्यांनी तब्बल चार कोटी रुपये खर्चून तळेमाऊली ग्रामदेवतेचे सुंदर मंदिर गावाशेजारी बांधले आहे. ते एक चांगले पर्यटन स्थळ झाले आहे. गत निवडणुकीत नऊपैकी आठ जागा बिनविरोध निवडून आणण्यात ते यशस्वी झाले होते. यावेळेला त्यांच्या राजकीय व्यापातून त्यांना गावातील निवडणुकीकडे फारसे लक्ष देता आले नाही. त्यात ते सत्तेत नसल्याचाही परिणाम झाला. मध्यंतरी त्यांनी पुण्यातील एका सभेत कोल्हापूर जिल्ह्यातून आजही कुणी राजीनामा दिला तर कोणत्याही मतदार संघातून मी विधानसभेला निवडून येऊ शकतो, असे जाहीर केले होते. भाजपचा जिल्ह्यात एकही आमदार नाही, त्यामुळे कोणीही राजीनामा देणार नाही, हे माहीत असल्यानेच त्यांनी ही घोषणा केल्याची टीका त्यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली होती. आता आमदार पाटील यांचा गावातच पराभव झाल्यामुळे विरोधकांना टीका करण्यासाठी आयतीच संधी मिळाली आहे.