इचलकरंजी : उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या खिशाला पेन नव्हता. अडीच वर्षात फक्त दोनवेळाच ते मंत्रालयात आले आणि आता मुख्यमंत्रीपदासाठी कटोरा घेऊन दिल्लीला गेले. परंतु त्यांना काही मिळाले नाही. त्यामुळे सध्या ते मुख्यमंत्र्याची खुर्ची घेऊन झोपतात. तरीही त्यांना झोप लागत नाही, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.इचलकरंजी येथे भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी सहकार खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार धनंजय महाडिक, भाजपा संघटन मंत्री मकरंद देशपांडे, राजेश पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.बावनकुळे म्हणाले, विरोधकांना मुख्यमंत्रीपदासाठी सत्ता हवी आहे. ठाकरे यांना स्वत:साठी, शरद पवार यांना सुप्रिया सुळेंसाठी, तर कॉँग्रेसमध्ये बाराजण मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक आहेत. परंतु भारतीय जनता पार्टी राज्यातील चौदा कोटी जनतेच्या विकासासाठी सत्ता मागत आहे. राज्य आणि केंद्रात एक सरकार असेल, तर विकासाला गती मिळेल. परंतु महाविकास आघाडीचे सरकार आल्यास लाडकी बहीणसह सर्व योजना बंद करतील, तसे वक्तव्य करणारे व्हिडीओ माझ्याकडे आहेत.मोहोळ म्हणाले, भाजपा ही सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देणारी पार्टी आहे. राज्यात खुन्नशी व बदला घेण्याचे राजकारण सुरू आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाच्या कार्यात सहभागी होऊन नेत्यांना बळ द्यावे. कार्यक्रमास प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, माजी नगराध्यक्षा अलका स्वामी, शहर अध्यक्ष अमृत भोसले, बेळगावचे माजी आमदार संजय पाटील, आदी उपस्थित होते.
काँग्रेस सत्तेच्या राज्यात योजना बंदमध्यप्रदेश, छत्तीसगड, आसाममध्ये भाजपाचे सरकार आहे. तेथे लाडकी बहीणसह अन्य योजना सुरू आहेत. परंतु कर्नाटक, हिमाचल, तेलंगणा येथे कॉँग्रेसची सत्ता आली. तेथे या योजना त्यांनी बंद केल्या, असेही बावनकुळे यांनी सांगितले.