सडोली खालसा : गेल्या सहा वर्षांत ‘भोगावती’मध्ये केलेला भ्रष्टाचार दडपण्यासाठीच राष्ट्रवादीच्या मंडळींनी भाजपला जवळ केल्याचा आरोप कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी केला. ‘सह्याद्री’ उभारण्यासाठी ‘भोगावती’ मोडण्यासाठी आलेल्यांना इचलकरंजीचा रस्ता दाखवा, असे आवाहनही त्यांनी केले. राजर्षी शाहू आघाडीच्या प्रचारार्थ आरे, गाडेगोंडवाडी, कारभारवाडी येथील प्रचारदौऱ्यात ते बोलत होते. करवीर व राधानगरी तालुक्यांतील शेतकऱ्यांची ‘भोगावती’ ही दौलत आहे. तिची जपणूक करण्यासाठी ‘शाहू आघाडी’ला साथ द्या, असे आवाहन करीत पी. एन. पाटील म्हणाले, विरोधकांनी कारखान्यात भ्रष्टाचाराचा कळस केला आहे. कलम ८३ नुसार चौकशी झाली तर ही मंडळी सापडणार आहेत, या भीतीपोटीच सत्तेतील भाजपला जवळ केले आहे. पण आपला न्यायव्यवस्थेवर विश्वास असून, भ्रष्टाचाराची पैन्पै राष्ट्रवादीच्या मंडळींकडून वसूल केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. संजयसिंह पाटील म्हणाले, सहा वर्षांमध्ये ‘भोगावती’मध्ये भ्रष्ट कारभार बोकाळला. त्याचा उद्रेक म्हणून कधी नव्हे ते यावेळी कामगार संघटनेत व गावागावांतील ऊस उत्पादक सभासद, शेतकऱ्यांमध्ये उठाव झाला असून, ‘शाहू’ आघाडीचा विजय निश्चित आहे. मोलॅसिस, साखर, बगॅस विक्रीमध्ये तसेच अवास्तव दराने केलेली खरेदीत कोट्यवधींचा घोटाळा केला आहे. विरोधकांनी १ लाख ४२ हजार टन मोलॅसिस विकले. या मोलॅसिसच्या विक्रीत तर त्यांनी टनामागे ७०० ते १००० रुपयांपर्यंतचा ढपला पाडला. ऊसतोडणीत बगलबच्च्यांचा ऊस आणल्याचा आरोप पाटील यांनी केला. कृष्णराव पाटील, अरुण डोंगळे, पी. डी. धुंदरे, उदयसिंंह पाटील, राहुल पाटील, सरदार वरुटे, जयदीप मोहिते, संतोष पोर्लेकर, बबन रानगे, संदीप पाटील, बी. ए. पाटील, आदी यावेळी उपस्थित होते. (वार्ताहर)
भ्रष्टाचार दडपण्यासाठीच भाजपचा आधार
By admin | Published: April 21, 2017 12:09 AM