कोल्हापूर : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या आमदारांनी आणलेला वीस कोटीं रुपये विकासनिधींचा श्रीगणेशा येत्या २५ सप्टेंबरदरम्यान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-ताराराणी महायुतीच्या उमेदवारांच्यावतीने हा निधी प्रत्येक प्रभागात विकासकामांवर वापरण्यात येणार आहे. विकासकामांच्या जोरावर मतांचा गठ्ठा खेचून आणून महापालिकेवर सत्तेचा झेंडा फडकाविण्याचा भाजप-ताराराणी महायुतीचा डाव आहे; पण या विकासकामांवर राष्ट्रवादी-जनसुराज्य आघाडीच्या नेत्यांच्याही नजरा लागल्या आहेत.महापालिकेवर भाजप-ताराराणी आघाडीची सत्ता आणण्यासाठी पालकमंत्र्यांसह नेत्यांनी विविध माध्यमातून व्यूहरचना सुरू केली आहे. त्यात थेट पालकमंत्रीच प्रत्येक प्रभागात ‘घर ते घर दौरा’ करणार आहेत. याशिवाय कोपरा सभा, पदयात्रांचे नियोजन केलेले आहेच; पण निवडणुकीच्या तोंडावरच केलेली विकासकामेच मतदारांच्या नजरेत भरली जातात. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि आमदार अमल महाडिक यांनी शासनाकडून सुमारे वीस कोटीं रुपयांचा निधी प्रभागवार विकासकामे करण्यासाठी आणला आहे; पण हा निधी कोणत्या भागात, किती खर्च करायचा, याचेही नियोजन करण्यात आले आहे. याच करण्यावरून पंधरा दिवसांपूर्वी येथील शासकीय विश्रामगृहावर वाद झाला होता. महापालिकेचे अधिकारी निधी वाटपाबाबत नियोजन करत बसले असताना राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी त्या अधिकाऱ्यांशी वाद घालून संबंधित कागदपत्रे काढून घेतली होती, त्यावेळी महापालिकेचे अधिकारी विश्रामगृहावरून पळून गेले होते. याच निधींचे टेंडर आज, शुक्रवारी प्रसिद्ध होत असून अवघ्या चार दिवसांत ते मंजूर करून घेऊन येत्या २५ सप्टेंबर दरम्यान प्रत्येक प्रभागातील या मंजूर विकासकामांचा श्रीगणेशा करण्यात येणार आहे. या विकासकामांचे श्रेय त्या-त्या प्रभागातील भाजप-ताराराणी महायुतीच्या उमेदवाराला मिळावे व तो निवडून यावा, असेच याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे बहुतांशी प्रभागात महायुतीचे उमेदवार पक्के झाले आहेत, फक्त त्यांच्या नावांच्या अधिकृत घोषणाच बाकी राहिल्या आहेत. काशणात्या प्रभागातील कोणती विकासकामे करायची याची यादी यापूर्वीच पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी तयार करून ठेवचली आहे. ही यादी महापालिकेकडे टेंडरसाठी दिलेली आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांच्या आरत्या-देखावा उद्घाटनासह या विकासकामांचा सपाटा महायुतीच्या नेत्यांकडून लावला जाणार आहे. पण या विकासकामांच्या प्रक्रियेवर राष्ट्रवादी-जनसुराज्य आघाडीच्या नेत्यांच्या नजरा लागल्या आहेत. त्यामुळे भविष्यात त्यावरून कलगी तुरा होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
‘भाजप-ताराराणी’च्या उमेदवारांचे ‘बल्ले-बल्ले’
By admin | Published: September 18, 2015 12:24 AM