कोल्हापूर : महानगरपालिकेचे ‘आयुक्त’पद हे शासननियुक्त पद आहे. सभागृहामध्ये कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार हा सभागृहाला आहे; त्यामुळे जनतेच्या विरोधातील धोरण नाकारण्याचा अधिकारही सभागृहाला आहे. असे असताना काँग्रेस-राष्ट्रवादीला बदनाम करण्याचे कारस्थान करून आयुक्तांची चमचेगिरी करण्याचे काम भाजप-ताराराणी आघाडी करीत असल्याचा आरोप काँग्रेस आघाडीचे गटनेते शारंगधर देशमुख आणि राष्ट्रवादी आघाडीचे गटनेते सुनील पाटील यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केला आहे. पत्रकात म्हटले की, शहराच्या विरोधात किंवा सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या विरोधात आयुक्त निर्णय घेत असतील तर त्यांना आम्हाला घटनेने दिलेल्या अधिकारांचा वापर करून विरोध करणारच. जर योग्य निर्णय घेणार असतील तर त्याला पाठिंबा देण्याची काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची भूमिका स्पष्ट आहे; पण भाजप-ताराराणी आघाडीचे पदाधिकारी सत्यजित कदम हे एप्रिल-मेच्या स्थायी समितीच्या बैठकीत आयुक्त हे स्थायी समितीत येत नाहीत, म्हणून त्यांना परत पाठवा. त्यांचा ठराव करा, मी पालकमंत्र्यांकडून तो मंजूर करून आणतो, असे वारंवार बोलत आहेत. मग हा त्यांचा एकपात्री नटरंगीपणा कशासाठी? महासभेत बोलायचे एक, स्थायी समितीमध्ये वेगळेच वागायचे आणि खासगीत अधिकारी, नगरसेवकांसमोर वेगळेच बोलायचे; नंतर भाजप-ताराराणी आघाडीच्या नावाखाली काँग्रेस-राष्ट्रवादीला नावे ठेवून वेगळेच पत्रक काढायचे, अशी त्यांची नीती आहे. आयुक्तांच्या बाबतीत ठराव करायचा झाला तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी पक्षांच्या सर्व नगरसेवकांबरोबर चर्चा करून निर्णय घेऊन रीतसर प्रक्रिया करता येईल. आता लवकरच महासभा नसल्याने भाजप-ताराराणी आघाडीचा कांगावा हा फक्त आयुक्तांच्या चमचेगिरीसाठीच आहे. आयुक्तांची लाचारी करण्यासाठी शासनाकडून प्रलंबित अनुदान मिळवा व शहरविकासात ‘अच्छे दिन’ आणा, असाही टोला पत्रकाद्वारे मारला आहे. (प्रतिनिधी)
‘भाजप-ताराराणी’ने चमचेगिरी थांबवावी
By admin | Published: May 30, 2016 12:16 AM