कोल्हापूर : चिकोत्रा खोऱ्यातील नागनवाडी प्रकल्पाबरोबरच जिल्ह्यातील रखडलेले आठ प्रकल्प मार्गी लावून जिल्ह्यात १० टीएमसी पाणीसाठा वाढविण्यासाठी भाजपने पुढाकार घेतला आहे. यासाठी उद्या, रविवारी दुपारी १ वाजता तमनाकवाडा (ता. कागल) येथे सर्वपक्षीय पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले असून यावेळी ५ हजार लोक उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आमदार सुरेश हाळवणकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. या प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी पक्षातर्फे येत्या काळात टप्प्या-टप्प्याने पुढाकार घेतला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.आ. हाळवणकर म्हणाले, या परिषदेसाठी महसूलमंत्री एकनाथ खडसे, सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील, भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांची प्रमुख उपस्थित असणार आहे. कृष्णा खोरे लवादाने महाराष्ट्र राज्यासाठी एकूण ६६६ टीएमसी इतका पाणी कोटा मंजूर केला आहे. यापैकी कोल्हापूर जिल्ह्यसाठी ११० टीमसी पाणी अडविण्याचे नियोजन आहे; परंतु १० टीएमसी पाणी विविध कारणांनी रखडलेल्या सिंचन प्रकल्पांमुळे अडविलेच गेले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नागनवाडी, उचंगी, आंबेओहोळ, सर्फनाला, धामणी, कांजिर्णे, झांबरे, सोनुर्ले हे आठ प्रकल्प पूर्ण करणे, ० ते २५० हेक्टर क्षमतेचे लघु पाटबंधारे तलाव, साठवण तलाव, पाझर तलाव, बंधारे असे स्थानिक स्थरावरील लघुसिंचन प्रकल्प पूर्ण करणे, चिकोत्रा समन्यायी पाणी वाटपाचा पथदर्शी प्रकल्प राज्याच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई (पीएमकेएसआय) योजनेत समाविष्ट करणे हा या परिषदेच्या आयोजनाचा उद्देश आहे. ते म्हणाले, हे सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यास १० टीएमसी पाणी अडविले जाणार असून जिल्ह्यातील ४० हजार एकर जमीन ओलिताखाली येणार आहे. ठिबकद्वारे हेच क्षेत्र ८० हजार एकरांपर्यंत वाढविणे शक्य आहे तसे झाल्यास कोल्हापूर हा देशातील सिंचनाच्याबाबत सर्वाधिक अग्रेसर जिल्हा ठरेल तसेच धामणी खोऱ्यातील तीन टीएमसी पाणी केवळ कोल्हापूर शहरासाठी आरक्षित असून शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघू शकेल. यासाठी मुख्यमंत्री, पालकमंत्री, ग्रामविकास मंत्री, कृषी व महसूल मंत्री यांच्यासमवेत एक व्यापक बैठक घेऊन प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेच्या आराखड्यात हे प्रकल्प समाविष्ट करून २०२१पर्यंत हा आराखडा मार्गी लावण्याचा निर्धारही या परिषदेत केला जाणार आहे. तमनाकवाडामधील उपसा सिंचन योजना संपूर्ण गावासाठी ठिबकमध्ये रूपांतरीत करून ‘पीएमकेएसआय’चे मॉडेल उभे करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)व्यापक दृष्टीच्या अभावाने महाराष्ट्राचे पाणी आंध्र, कर्नाटकलायापूर्वीच्या नेतृत्वाचा व्यापक दृष्टीचा अभाव व अकार्यक्षमतेमुळे येथील पाणी अडविता आले नाही. परिणामी महाराष्ट्रातील पाणी आंध्र प्रदेश व कर्नाटकला निघाले आहे, असे हाळवणकर यांनी सांगितले..रोष टाळण्यासाठीच मुश्रीफ यांना निमंत्रण नाहीकोल्हापूर : पंधरा वर्षे हातात सत्ता असूनही सिंचनाचे प्रकल्प पूर्ण न करणाऱ्या आमदार हसन मुश्रीफ यांना भाजपतर्फे आयोजित पाणी परिषदेला निमंत्रित केल्यास स्थानिक जनतेचा रोष ओढवेल, म्हणूनच त्यांना निमंत्रण दिले नसल्याचे स्पष्टीकरण आमदार सुरेश हाळवणकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केले.उद्या, रविवारी तमनाकवाडा (ता. कागल) येथे भाजपतर्फे आयोजित सर्वपक्षीय पाणी परिषदेला आमदार हसन मुश्रीफ यांना निमंत्रण का दिले नाही? या पत्रकारांच्या प्रश्नावर हाळवणकर यांनी हे उत्तर दिले.हाळवणकर म्हणाले, गेली पंधरा वर्षे त्यांचे राज्य होते. तरीही आमदार मुश्रीफ हे सिंचन प्रकल्प पूर्ण करू शकले नाहीत. त्यांनी याबाबत आमच्यासारखी सकारात्मक भूमिका घेतली असती तर हे प्रकल्प यापूर्वीच पूर्ण झाले असते व हा प्रश्न कायमचा मार्गी लागला असता. अशा परिस्थितीत अर्धवट प्रकल्पांमुळे नक्कीच स्थानिक जनतेमध्ये मुश्रीफांप्रती रोष आहे. त्यामुळे त्यांना निमंत्रित केल्यास रोष उफाळून येईल. यासाठी त्यांना निमंत्रण देण्यात आलेले नाही. लोकनेते स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक व विक्रमसिंहराजे घाटगे यांनी कागल तालुक्यात सिंचनाच्या माध्यमातून केलेली धवलक्रांती व त्यांचे योगदान पाहता, त्यांचा योग्य तो सन्मान करण्यात आला आहे. ते म्हणाले, या परिषदेच्या माध्यमातून राज्याला एक नवी दिशा मिळेल.
भाजपची उद्या सर्वपक्षीय पाणी परिषद
By admin | Published: May 28, 2016 12:40 AM