कोल्हापूर : कोल्हापूर शहराला ऐतिहासिक वारसा आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकहाती भाजपची सत्ता येण्यासाठी सर्व ताकदीनिशी उतरणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. दानवे म्हणाले, केंद्र आणि राज्यातील योजना कोल्हापूर शहरात प्रभावीपणे राबविण्यासाठी महानगरपालिकेत भाजप सत्तेवर येणे महत्त्वाचे आहे. महानगरपालिकेत कोणाशी युती करायची, याचा निर्णय स्थानिक नेत्यांना दिले आहेत. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत सर्व ताकदीनिशी उतरण्याची तयारी केली आहे. प्रचारात भाजपचे मंत्री, नेते सक्रिय होतील. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, सर्किट बेंचसंबंधी शासनाने एकमुखी निर्णय घेतला आहे. यापूर्वीच्या शासनाने जे केले नाहीत ते आमच्या शासनाने केले आहे. शासन कोल्हापूरलाच सर्किट बेंच व्हावे यावर ठाम आहे. पुणे आणि सोलापूर येथेही मागणी आहे. पहिली मागणी असल्याने मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोल्हापूरला सर्किट बेंच व्हावे, असा ठराव केला आहे. त्यामुळे सर्किट बेंचसंबंधी शासनाची भूमिका स्पष्ट आहे. चर्चा, संवाद अशा लोकशाही मार्गाने प्रश्न सोडविता येतात. त्यामुळे ‘कोल्हापूर बंद’ करून सामान्यांना त्रास देणे बरोबर नाही. मराठी मतदारांचे हक्कदार आम्हीच... शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना नव्हे तर मराठी मतदारांचे हक्कदार भाजपच आहे. जातीआधारीत आम्ही राजकारण करत नाही. जैनधर्मियांसंबंधी काढलेल्या एका परिपत्रकामुळे कोणत्याही एका धर्माला जवळ करणे, असा अर्थ काढणे चुकीचे आहे, असे एका इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या प्रतिनिधीशी बोलताना दानवे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांचा सत्कार महापालिकेत भाजपचा महापौर झाल्यावर आपण स्वत: मुख्यमंत्री फडणवीस यांना घेऊन कोल्हापुरात येऊन त्यांचा सत्कार करू. तसेच केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून जितका देता येईल तितका निधी देऊ, अशी ग्वाहीही दानवे यांनी दिली.
एकहाती सत्तेसाठी भाजप ताकदीने उतरणार : दानवे
By admin | Published: September 10, 2015 12:44 AM