'फोडाफोडीच्या राजकारणाने भाजपच संपेल', काँग्रेसच्या ‘हात से हात जोडो’ अभियानास कोल्हापुरात उद्यापासून सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 01:19 PM2023-01-25T13:19:41+5:302023-01-25T13:20:11+5:30
संपर्क चांगला असेल तर नेटवर्क तुटत नाही
कोल्हापूर : देशात तीनशे हून अधिक आमदार, खासदारांना फोडत सात राज्यातील सरकार पाडण्याचे काम भाजपने केले. फोडाफोडीचे राजकारण एक दिवस भाजपलाच संपवेल, असा विश्वास व्यक्त करत काँग्रेसचे ‘हात से हात जोडो’ अभियान जिल्ह्यात ताकदीने राबवण्याचे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी केले.
काँग्रेसने भारत जोडो यात्रेनंतर देशात ‘हात से हात जोडो’ अभियान हाती घेतले आहे. कोल्हापुरात गुरुवार (दि. २६) पासून सुरुवात होत असून त्याच्या तयारीसाठी आयोजित केलेल्या बैठकीत आमदार पाटील बोलत होते.
काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड म्हणाले, जनतेला सरकार घाबरले तर तिथे लोकशाही असते, मात्र सरकारला जनता घाबरु लागली तर तिथे हुकूमशाही असते, देशात सध्या हुकूमशाही सुरु आहे. घटना बदलण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरु असून त्याला रोखण्यासाठी राहुल गांधी यांनी देशभर भारत जोडो यात्रा काढली.
काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख, आमदार पी. एन. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. शशांक बावचकर यांनी स्वागत केले. यावेळी आमदार प्रा. जयंत आसगावकर, राजू आवळे, ऋतुराज पाटील, गुलाबराव घोरपडे, सचिन चव्हाण, राहुल पाटील, राहुल खंजीरे आदी उपस्थित होते.
२०२४ ची निवडणूक यु ट्यूबचा वापर
लोकसभा व विधानसभा २०१९ ची निवडणूक व्हॉट्सॲप भोवती फिरली, या माध्यमाचा भाजपने पुरेपूर वापर करत सत्ता हस्तगत केली. आगामी २०२४ च्या निवडणुकीत यु ट्यूबचा मोठ्या प्रमाणात वापर केला जाणार असून काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी या तंत्राचा आतापासूनच वापर करावा, असे आवाहन सतेज पाटील यांनी केले.
संपर्क चांगला असेल तर नेटवर्क तुटत नाही
संपर्काची रेंज चांगली असेल तर मोबाइलची रेंज तुटत नाही. या अभियानाच्या माध्यमातून लोकांशी चांगला संपर्क ठेवला तर तुमचे नेटवर्क अधिक चांगले होईल असे सांगत ज्या मतदारसंघात काँग्रेसचा आमदार नाही, तिथे आपण व आमदार प्रा. जयंत आसगावकर हे अभियानात सहभागी होणार असल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले.
एप्रिलमध्ये जिल्हा परिषदेचे बिगुल
एप्रिल, मे महिन्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या अभियानाच्या माध्यमातून घराघरात जावे, असे आवाहन सतेज पाटील यांनी केले.