वसंत भोसले --कोल्हापूर --केंद्र आणि राज्यात सत्ताधारी झालेला भारतीय जनता पक्ष येणाऱ्या जिल्हा परिषदा तसेच तालुका पंचायतींच्या निवडणुकीसाठी आयात केलेल्या उमेदवारांवर हत्तीचे बळ निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. दक्षिण महाराष्ट्रातील तिन्ही जिल्हा परिषदांमधील एकूण १९१ सदस्यांमध्ये विद्यमान सभागृहात भाजपचे केवळ चार सदस्य आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेसच्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते आपल्याकडे वळवून त्यांनाच भाजपचे उमेदवार बनविण्याचा खटाटोप चालू आहे. त्यामुळे मूळच्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसत आहे.दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हा परिषद कॉँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना आघाडीकडे आहे. सातारा आणि सांगली जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे स्पष्ट बहुमत आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेत भाजपचे तीन आणि साताऱ्यात एकमेव सदस्य आहे. सांगली जिल्हा परिषदेत अजूनही भाजपला खाते उघडायचे आहे. सध्या दक्षिण महाराष्ट्रातील २६ आमदारांपैकी ६ आमदार भाजपचे आहेत. चारपैकी सांगलीचे खासदार संजयकाका पाटील भाजपचे आहेत. नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत दक्षिण महाराष्ट्रात भाजपने ७१ नगरसेवक आणि चार ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आणले आहेत. या यशाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदा आणि तालुका पंचायत समित्यांमध्येही शिरकाव करण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली आहे, पण पक्षाचे कार्यकर्ते कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसशी लढत देण्यास समर्थ नसल्याने या दोन पक्षाच्या कार्यकर्त्यानाच प्रवेश देऊन पक्ष निवडणुकीची तयारी करीत आहे. गेले काही दिवस राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील या तिन्ही जिल्ह्यांचे दौरे करीत आहेत. त्यांच्या प्रत्येक सभा-समारंभात दोन्ही कॉँग्रेसचे दुसऱ्या अन् तिसऱ्या फळीतील कार्यकर्ते प्रवेश करीत आहेत. त्यापैकी अनेकांना उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले जात आहे, तर काहींना त्यांच्या संस्थांना मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. आतापर्यंत विरोधी पक्षातील जवळपास शंभरांवर प्रमुख कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मित्रपक्षात अविश्वासाचे वातावरण ---शिवसेना आणि भाजपची राज्यपातळीवर युती अनिश्चित असल्याने या दोन्ही मित्र पक्षांमध्ये अविश्वासाचे वातावरण आहे. शिवाय भाजपने कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीत उतरविण्याची तयारी चालविल्याने शिवसेना तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रचंड नाराजी आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रसंगी कॉँग्रेसबरोबर स्थानिक पातळीवर आघाडी करण्यासाठी चर्चा सुरू केली आहे. भाजपने युतीचे चित्र स्पष्ट नसताना कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ४४ जागा लढविण्याचे जाहीर केले आहे. यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या परंपरागत विरोधकांचा भरणा असल्याने खासदार राजू शेट्टी यांनी जाहीर टीका करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसमधील गटबाजी उफाळली ---भाजपने प्रथमच तडजोड करून का असेना कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षासमोर आव्हान निर्माण केले आहे. सध्याचे वातावरण तसे आहे. याउलट सत्ताधारी कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षामध्ये प्रचंड गटबाजी दिसत आहे. साताऱ्यात खासदार उदयनराजे कॉँग्रेसच्या आघाडीत सामील होण्याच्या तयारीत आहेत. कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक कॉँग्रेसला विरोध करण्यासाठी भाजपशी आघाडी करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे सध्यातरी दक्षिण महाराष्ट्रात तिरंगी सामना रंगणार आहे; पण कालचे मित्र आजचे विरोधक अशा या सोयीस्कर आघाड्या आकाराला येत आहेत. भाजपला नगरपालिका निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे अनेकजण या पक्षात प्रवेश करीत आहेत. शिवाय भाजपकडे जिल्हा परिषदा आणि तालुका पंचायत समित्यांसाठी स्वपक्षाचे सक्षम कार्यकर्ते म्हणून पुढे येत नाहीत, अशी या पक्षाची गोची झाली आहे. भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये सर्वाधिक कार्यकर्ते राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आहेत. राष्ट्रवादील सर्वत्र दररोज कुठा ना कुठे दणका बसत आहे. या कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्याचे प्रयत्न कोणत्याही नेत्याकडून होताना दिसत नाहीत. या पार्श्वभूमीवर कॉँग्रेसला संधी आहे; पण या पक्षातील वरिष्ठ नेते आपापला गट सांभाळण्यात गुंग असल्याने पुन्हा गटबाजी उफाळून येत आहे. संपूर्ण कॉँग्रेस एकजिनसी होऊन निवडणुकीची तयारी करताना दिसत नाही.
भाजपा आयारामांवर लढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2017 11:00 PM