ज्योतीप्रसाद सावंत । लोकमत न्यूज नेटवर्क -आजरा : गेले वर्षभर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे अशोक चराटी यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा यासाठी प्रयत्नशील होते. वर्षभरानंतर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, चराटी यांचा समारंभपूर्वक भाजप प्रवेश होणार असून, मोजक्या कार्यकर्त्यांच्या जोरावर धावणारी भाजपची गाडी आता मात्र सुसाट धावणार असल्याने भाजपमध्ये चैतन्याचे वातावरण आहे.अण्णा-भाऊ संस्था समूहाचे प्रमुख म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोकअण्णांचा परखड स्वभावाचा फटका आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह अनेकांना वेळोवेळी बसला आहे. माजी आमदार के.पी. पाटील यांना आमदारकीतून बाजूला करून प्रकाश आबिटकर यांना आमदार बनविण्यातही त्यांचा मोठा वाटा आहे. चांगल्या संस्थांचे असणारे पाठबळ, कार्यकर्त्यांची भक्कम फळी यामुळे चंद्रकांतदादा यांनी त्यांच्या भाजप प्रवेशाकरिता प्रयत्न चालविले होते.आजरा साखर कारखाना निवडणुकीत, जिल्हा परिषद निवडणुकीवेळी यामुळेच चराटी यांना रसद पुरविण्याचे काम भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी केले होते. जि. प. निवडणुकीच्या तोंडावर चराटी यांनी भाजप प्रवेश करावा यासाठी जोरदार प्रयत्न सुरू होते. पण, स्थानिक अडचणींमुळे त्यावेळी चराटी यांनी भाजप प्रवेश टाळला. तालुक्यातील प्रकल्प आजही अपूर्णावस्थेत आहेत. आजरा नगरपंचायतीचा प्रश्न असो की कारखान्यातील डिस्टिलरी प्रकल्पाचा प्रश्न असो, तो मार्गी लागण्यासाठी राज्य व केंद्र सरकारच्या मदतीशिवाय पर्याय नाही. आजऱ्यात भाजपला अशोकअण्णांची गरज आहे, तर अशोकअण्णांना राज्य व केंद्र सरकारच्या मदतीची गरज आहे. त्यामुळेच अशोकअण्णांनी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला असल्याचे ते स्वत: मान्य करतात.अण्णा-भाऊ संस्था समूहाची व्याप्ती मोठी आहे. आजरा अर्बन बँक, आजरा सूतगिरणी, जनता शिक्षण संस्था यासह सुमारे वीस संस्थांचे या समूहातंर्गत कामकाज सुरू आहे. अशोकअण्णा स्वत: जिल्हा बँक, आजरा साखर कारखाना, राज्य वस्त्रोद्योग महामंडळ, कृषी उत्पन्न बाजार समिती या संस्थांबरोबरच आजरा ग्रामपंचायतीचा कारभारही पाहत आहेत. अण्णा-भाऊ संस्था समूह भारतीय जनता पक्षाशी जोडला जाणे तालुका भाजपच्या पथ्यावर निश्चितच पडणार आहे.आॅक्टोबर महिन्यात तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकांसह पोटनिवडणुकांचाही कार्यक्रम होणार आहे. या निवडणुकाही भाजपच्या दृष्टीने सोप्या बनणार आहेतच. पण, त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपने उमेदवार उभा केल्यास भाजपची मतांची बेरीज वाढणार आहे, हे निश्चित.थोडा उशीर झालाजिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर अशोकअण्णांनी भाजप प्रवेश केला असता तर जिल्हा परिषदेसह पंचायत समितीमध्ये आज वेगळे चित्र दिसले असते असे राजकीय जाणकारांतून बोलले जाते.सेना बॅकफूटवर येणारअशोकअण्णांच्या साथीने सेनेने विधानसभेसह आजरा कारखाना व इतर संस्थांमध्ये राजकीय जोडण्या घातल्या होत्या. यामुळे ठिकठिकाणी सेनेने प्रतिनिधित्वही मिळविले होते. परंतु, अशोकअण्णांच्या भाजप प्रवेशाने अंतर्गत गटबाजीचे ग्रहण लागलेली शिवसेना बॅकफूटवर येणार आहे.
आजरा तालुक्यात भाजपला मिळणार बळ
By admin | Published: June 01, 2017 12:37 AM