कोल्हापूर : एकीकडे कोल्हापूर महापालिकेची निवडणूक आणि दुसरीकडे जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. सत्तेत नसलेल्या आणि एकाकी पडलेल्या भाजपची या निवडणुकांमध्ये सत्त्वपरीक्षा असून यासाठीच ग्रामीण पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे बुधवारी आयोजन करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष चंदरकांत पाटील हे यावेळी उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले.
कोल्हापूर महापालिकेसाठी रणधुमाळी सुरू झाली आहे. गेल्या निवडणुकीमध्ये भाजपने १४ नगरसेवक निवडून आणले होते तर महाडिक यांच्या ताराराणी आघाडीने त्यांच्यापेक्षा जास्त म्हणजे १९ नगरसेवक निवडून आणले होते. त्यावेळी भाजप-शिवसेना सत्तेत एकत्र असूनही अखेरपर्यंत राजेश क्षीरसागर भाजपच्या हाताला लागले नाहीत. आतातर भाजप एकाकी पडला आहे. त्यामुळे शहरात भाजपचा कस लागणार आहे. ताराराणी आघाडीची सोबत आणि नरेंद्र मोदी यांच्या कारभारावर भरोसा ठेवूनच भाजपला आपली व्यूहरचना करावी लागणार आहे.
जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. पाच वर्षे भाजपची सत्ता असताना प्रत्येक तालुक्यात जोडण्या घालत चंद्रकांत पाटील यांनी अनेक जणांना पक्षात आणले; परंतु राज्यातील सत्ता गेल्याने आता ही मंडळी बॅकफूटवर आल्याचे चित्र आहेत. ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी रोज काही ना काही दौरा, कार्यक्रम सुरूच ठेवला आहे. या निवडणुकांमध्ये समरजित घाटगे यांच्यासह भाजपच्या तालुकास्तरीय नेत्यांनाही अधिक कार्यप्रवण व्हावे लागणार आहे.
सध्या ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनीदेखील या निवडणुकांमध्ये लक्ष घातले आहे. दोन्ही काँग्रेसच्या तालुकास्तरीय नेत्यांनाही त्याच्या पुढच्या वाटचालीची काळजी असल्याने त्यांनीही जोडण्या घातल्या आहेत. आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांसाठी ग्रामपंचायतीची सत्ता महत्त्वाची असल्याने त्यादृष्टीनेही नेतेमंडळी सक्रिय झाली आहेत.
अशा परिस्थितीमध्ये आता भाजपला आपले नियोजन करावे लागणार आहे. निवडणुकीनंतर गरज पडलीच तर शिवसेनेचे सदस्य दोन्ही काँग्रेसबरोबर जातील. मात्र, भाजपला एकाकी पाडण्याचे नियोजन होऊ शकते. त्यामुळे भाजपची खऱ्या अर्थाने सत्त्वपरीक्षा आहे.
चौकट
भाजपमध्ये नव्या-जुन्यांचा संघर्ष
भाजपमध्ये नव्या-जुन्यांचा संघर्ष गेली सहा वर्षे सुरू आहे. मात्र, सत्ता गेल्यानंतर भाजपमधील काहीजणांचे धाडस वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचमुळे प्रदेशाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांचा राजीनामा मागण्यात आले. या आरोपांनंतर आता पहिल्यांदाच भाजपचे पदाधिकारी एकत्र येत आहेत.