कोल्हापूर : ‘आमचं सरकार आलं तर आम्ही आरक्षण रद्द करणार’ असं अमेरिकेमध्ये जाऊन म्हणणारे राहुल गांधी यांच्याविरोधात आम्ही कोल्हापूरमध्ये शक्य आहे तिथे निदर्शने करणार आहोत, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. अंबाबाईच्या दर्शनानंतर गुरुवारी ते पत्रकारांशी बोलत होते. हा आमचा हक्क असल्याने पोलिसांनीही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याचे प्रकार करू नयेत, असेही ते म्हणाले.गांधी यांच्या दौऱ्याबाबत पाटील म्हणाले की, कोणी कुठं जावं हा अधिकार लोकशाहीने प्रत्येकाला दिला आहे. तसं कोणाच्या विरोधात निदर्शनं करावीत हादेखील अधिकार लोकशाहीने दिला आहे. संविधान बदलणार असं नॅरेशन तयार करून आम्हाला थोडं पाठीमागे नेलं. पण, तो विषय लोकांच्या लक्षात आला. तुम्ही तर आरक्षण रद्द करू म्हणालात. आम्ही तुमचा कार्यक्रम उधळणार नाही. परंतु, विरोध व्यक्त करू. कार्यक्रमाचे संयोजक सतेज पाटील यांनीही त्यांना सांगावं की, ही त्यांच्या अमेरिकेमधील भाषणाच्या विरोधातील प्रतिक्रिया आहे म्हणून. तुम्ही मोदी, शाह यांच्याविरोधात काळे झेंडे घेऊन उभे राहता. तर आम्हांलाही निदर्शने करू द्या.शिवस्मारकाबाबत केस घालणाऱ्याला घेराव घालामोठे राजे, संभाजीराजे, मालोजीराजे यांच्याबद्दल आम्हांला आदरच आहे. पण, संभाजीराजे यांना आठवण करून देतो की, अरबी समुद्रातील स्मारकासाठी या आधीच्या सरकारने काहीच केलं नव्हतं. देवेंद्र फडणवीस यांनी परवानग्या आणल्या, डिझाइन तयार केलं, टेंडर निघालं, २५ टक्के काम झालं आणि स्थगिती आली. ज्यांनी याचिका दाखल केली त्याला घेराव घाला. ती मागे घ्यायला लावा. दुसऱ्या मिनिटाला काम सुरू होईल.
कोथरूडमध्ये लढणार, मोहोळ, महाडिकांना मदतजागा वाटपाचे सर्व अधिकार फडणवीस यांना दिले आहेत. आम्हांला जादा जागा मिळणे नैसर्गिक आहे. परंतु, मला यावेळी लोकसभेसारखं फिरता येणार नाही. कारण, मला कोथरूड विधानसभा लढवता लढवता पश्चिम महाराष्ट्रासाठी मुरलीधर मोहोळ आणि धनंजय महाडिक यांना मदत करायची आहे. हर्षवर्धन पाटील यांनी पक्ष सोडण्याबाबत कोणतेही संकेत दिलेले नाहीत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.