सरवडे/कोल्हापूर : माझे हेलिकॉप्टर भरकटले, मी कागलला पोहोचलो नाही, याचे विरोधकांना बरे वाटले. पण भाजपला देशातून घालवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. अच्छे दिनच्या नावाने १२५ कोटी जनतेला फसवले अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी येथे केली.राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यव्यापी परिवर्तन निर्धार यात्रेला कोल्हापूर जिल्ह्यातून सुरुवात झाली. कागलनंतर भुदरगड तालुक्यातील मुदाळ येथे झालेल्या जाहीर सभेत मुंडे बोलत होते. त्यांच्यासोबत व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष ए. वाय. पाटील, आदी उपस्थित होते.धनंजय मुंढे यांनी सरकारवर कडक शब्दात टीका केली. सरकारने खाती उघडली, पण अजून १५ लाख जमा केलेले नाहीत. पेट्रोल, डाळ, गॅस आमच्यावेळी स्वस्त होते, मात्र आज पेट्रोल ६० चे ९२ रुपये झाले. ४०० रुपयांचा गॅस १००० रुपये झाला. गॅसच्या एका टाकीमागे ६२५ रुपये लुटले, तेही दिवसाढवळ्या. देशातील अन्य राज्यांनी तसेच फ्रान्सनेही ५७० कोटीला एक अशी विमाने खरेदी केली. तर भारताने १६७० कोटी रुपयांना एक अशी ३६ विमाने खरेदी केली. जुन्या कंपनीची स्पेअर पार्ट पुरवण्याची आॅर्डर बदलून ती अनिल अंबानी यांना दिली, अशा शब्दात राफेल करारावर मुंढे यांनी टीका केली. याबाबत गुन्हा नोंद होईल म्हणून चांगल्या अधिकाऱ्यांची रात्री दोन वाजता बदली केली, अशी टीका मुंडे यांनी केली.मी चौकीदार म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींच्या व्यासपीठावर घोटाळा करणारे मंत्री कसे काय हजर असतात, असा सवाल करुन धनंजय मुंढे यांनी १६ मंत्र्यांनी भ्रष्टाचार केला. त्यांना संरक्षण कोण देतय असा सवाल केला. तीन मंत्र्यांच्या तुकड्यासाठी शिवसेनेने लाजारी पत्करली अशी टीका करुन सरकारने पाच लाख कोटी रुपयांचे कर्ज केले केले आणि महाराष्ट्राचे वाटोळे केले.
या सरकारच्या कालावधीत निरव मोदी, मल्ल्या यांनी देशातील अनेक बँकांना बुडवले, तर शेतकऱ्याला फसवी कर्जमाफी दिली. परदेशातील काळा पैसा आणला नाही, अशी टीका प्रदेशाध्यक्ष, माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी केली.