इचलकरंजी : जिल्ह्यातील कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही लोकसभेच्या जागा भारतीय जनता पक्ष जिंकेल. त्याचबरोबर वस्त्रोद्योग आणि सूतगिरण्यांना नवसंजीवनी देणारा निर्णयही शासन लवकरच घेईल, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.भारतीय जनता पक्षाच्या नूतनीकरण केलेल्या कार्यालयास सोमवारी त्यांनी सदिच्छा भेट दिली. तसेच पक्ष कार्यालयात नूतन अध्यक्षपदी अमृत भोसले यांची निवड झाल्याचे पत्र दिले. त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.मंत्री पाटील म्हणाले, सर्वच सर्वेक्षणात भाजपा आणि मित्रपक्षांना ३२५ हून अधिक जागा दाखविण्यात आल्या आहेत. तरीही आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी ४०० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. वस्त्रोद्योग आणि सूतगिरण्यांसाठी शासन सकारात्मक असून लवकरच चांगले निर्णय घेईल. महाराष्ट्रातून विभागवार तयार केलेल्या चारही गटांना अनुदानात वाढ, यंत्रमागधारकांना वीज सवलत कायम, प्रतियुनिट १ रुपया वीज बिल याचबरोबर अन्य काही निर्णय लवकरच घेतले जातील.भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर म्हणाले, पक्षबांधणी मजबूत झाली आहे. त्यामुळे इचलकरंजी महापालिकेचा पहिला महापौर हा भाजपच्या कमळ चिन्हावर निवडून येईल. भाजपाची पक्षबांधणी भक्कम असल्याने येणाऱ्या सर्वच निवडणुकांमध्ये भाजपाचे कमळ दिसेल. इचलकरंजीची जीवनदायिनी असणाऱ्या वस्त्रोद्योगाला दिलासा द्यावा.सुरूवातीला हाळवणकर यांच्यासमवेत पाटील यांची शहरातून जल्लोषी रॅली काढण्यात आली. जेसीबीने फुलांचा वर्षाव करण्यात आला. यावेळी राजवर्धन नाईक-निंबाळकर,अशोक स्वामी, मिश्रीलाल जाजू, अलका स्वामी, अनिल डाळ्या, आदी उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा भाजपा जिंकेल, मंत्री चंद्रकांत पाटीलांनी व्यक्त केला विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 5:42 PM