आत्मनिर्भर पॅकेज कुठे गेले ? युवक कॉग्रेसची चंद्रकांत पाटील यांच्या घरासमोर निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 05:57 PM2020-08-14T17:57:58+5:302020-08-14T18:00:51+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना महामारीच्या काळात २० लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केली होती. मात्र चार महिने झाले एक दमडीही मिळालेली नाही. या पॅकेजचे केंद्र सरकारने केले काय? याचा जाब विचारण्यासाठी शनिवारी युवक कॉग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी निदर्शने केली.
कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना महामारीच्या काळात २० लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केली होती. मात्र चार महिने झाले एक दमडीही मिळालेली नाही. या पॅकेजचे केंद्र सरकारने केले काय? याचा जाब विचारण्यासाठी शनिवारी युवक कॉग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी निदर्शने केली. त्याचबरोबर भाजपचे प्रदेश सदस्य, माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या कार्यालयासमोरही त्यांनी जोरदार निदर्शने केली, अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करीत निदर्शकांना ताब्यात घेतले.
कोरोना महामारीच्या काळात देशभरातील उद्योग बंद पडले, तरुणांचा रोजगार गेला अशा परिस्थितीत केंद्र सरकारकडून मदतीची अपेक्षा होती. आत्मनिर्भरच्या गोंडस नावाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटीचे पॅकेज जाहीर केले. गेले चार महिने अद्याप दमडीही मिळालेली नाही.
हे पॅकेज सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचलेले नाही, मग गेले कोठे? असा जाब विचारत युवक कॉग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी फलक झळकावत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या संभाजीनगर येथील निवासस्थानी निदर्शने केली. त्याचबरोबर धनंजय महाडिक यांच्या ताराराणी चौकातील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करीत पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.
चंद्रकांत पाटील हे आंदोलनकर्त्यांच्या भावना समजावून घेण्यापेक्षा घरी देवघरात पूजा करण्यात मग्न होते. आम्हाला पॅकेजचे काय झाले, याचे उत्तर अपेक्षित होते. यापुढे भाजपच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला जाब विचारला जाईल, असा इशारा कल्याणी माणगावे यांनी सांगितले. यावेळी युवक जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे, उपाध्यक्ष बयाजी शेळके, दीपक थोरात, उदय पोवार, विनायक पाटील, योगेश कांबळे, लखन भोगम, संजय सरदेसाई, संभाजी पाटील, आनंदा करपे, सनी सावंत, अनिल कांबळे, आदी उपस्थित होते.