इचलकरंजी : येथील नगरपालिका हद्दीमध्ये गणेशोत्सवाच्या काळात मंडपासाठी वाढविण्यात आलेली रस्ता खुदाई व भाड्याची आकारणी कमी करण्याच्या मागणीसाठी भाजपच्यावतीने नगरपालिकेवर ठिय्या आंदोलन करून नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांना घेराव घालण्यात आला. अखेर रस्ता खुदाईची आकारणी रद्द करण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.नगरपालिकेने शहरातील गणेशोत्सवासाठी रस्त्यांवर मंडप उभारणीकरिता २०० रुपये रस्ता खुदाई व ५५० रुपये रस्ता भाडे, अशी आकारणी सुरू केली होती. मात्र, वाढीव आकारणी रद्द करावी, या मागणीसाठी भाजपचे शहर अध्यक्ष विलास रानडे, नगरसेवक संतोष शेळके, युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष शशिकांत मोहिते, सरचिटणीस शहाजी भोसले, अनघा कुलकर्णी, दीपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेच्या इमारतीच्या प्रवेशद्वारात सुमारे अर्धा तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करून पालिकेचा परिसर दणाणून सोडला.त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आपला मोर्चा नगराध्यक्षा बिरंजे यांच्या दालनामध्ये वळविला. नगराध्यक्षा बिरंजे, मुख्याधिकारी प्रशांत रसाळ, अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांना घेराव घालण्यात आला. यावेळी झालेल्या चर्चेमध्ये आकारणी रद्द करता येणार नाही, असे सांगितल्यानंतर आणखीन जोरदार घोषणाबाजी केल्याने काही काळ गोंधळ उडाला. सुमारे तासभराच्या आंदोलनानंतर नगराध्यक्षा बिरंजे यांनी वाढलेल्या आकारणीचा फेरविचार केला जाईल, असे सांगितले. त्यानंतर नगराध्यक्षांनी मुख्याधिकारी व अतिरिक्त मुख्याधिकारी यांच्याबरोबर चर्चा केली. अखेर मंडप घालण्यासाठी केलेली रस्ता खुदाई पूर्वीप्रमाणे बुजवून देण्याच्या अटीवर २०० रुपये रद्द केले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. नगराध्यक्षांच्या दालनात हुल्लडबाजीनगराध्यक्षांच्या दालनामध्ये मोर्चाच्यावतीने चर्चा सुरू असताना त्यावेळी उपस्थित असलेल्या काही कार्यकर्त्यांनी निष्कारण शेरेबाजी करून गोंधळ माजविला. यावेळी हुल्लडबाजीही करण्यात आली. वास्तविक पाहता चर्चा सुरू असताना आणि आंदोलनकर्त्यांच्यावतीने नगरसेवक शेळके, विलास रानडे, दीपक पाटील व शहाजी भोसले बाजू मांडत असताना झालेल्या हुल्लडबाजीमुळे काहीसे गालबोट लागले. मात्र, या घटनेचे तारतम्य राखले नसल्याने काही अधिकारी व नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली.
भाडेवाढीच्या निषेधार्थ भाजपचे आंदोलन
By admin | Published: September 12, 2015 12:17 AM