कोल्हापूर :मंदिर बंद, उघडले बार...उद्धवा, धुंद तुझे सरकार, धार्मिक स्थळे सुरू करा, अशा घोषणा देत मंगळवारी भाजपच्या वतीने मिरजकर तिकटी येथे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. भजन, कीर्तन करीत सरकारला जाग येण्यासाठी साकडे घालण्यात आले. या आंदोलनात सहभागी झालेल्या महिलेच्या अचानक अंगात आल्याने काही काळ कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली.राज्य सरकारने मंदिरे खुली करावीत यासाठी भाजपतर्फे मिरजकर तिकटी येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात काही सर्वसामान्य महिलादेखील सहभागी झाल्या होत्या. त्यांनी इथे कापूर, आरती, धूप लावल्यानंतर महिलेच्या अंगात आले. त्यामुळे काही वेळ कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली.
यावेळी जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे म्हणाले, सध्या मॉल, मद्यालये, देशी दारू दुकाने सुरू, पण मंदिरे बंदच आहेत. बार, रेस्टॉरंटमध्ये गेलेला माणूस मास्क काढून वावरतो; परंतु मंदिरामध्ये गेलेला माणूस मास्क काढणार नाही; त्यामुळे मंदिरे सुरु व्हायला हवीत. संघटन सरचिटणीस अशोक देसाई म्हणाले, आज महाराष्ट्रात मंदिरे उघडा या मागणीसाठी आंदोलन करायला लागणे हे अत्यंत दुर्दैवी आहे.
यावेळी पंत बाळेकुंद्री मंडळाने भजन सादर केले. सरचिटणीस विजय जाधव, नगरसेविका उमा इंगळे, प्रमोदिनी हर्डीकर, गिरीश साळोखे, विजयसिंह खाडे-पाटील, विशाल शिराळकर, अप्पा लाड, चंद्रकांत घाटगे यांनी भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी सरचिटणीस दिलीप मेत्राणी, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, जिल्हा उपाध्यक्ष मारुती भागोजी, चंद्रकांत घाटगे, संजय सावंत, राजू मोरे, अमोल पालोजी, दिग्विजय कालेकर, भाजप गटनेते अजित ठाणेकर, मंडल अध्यक्ष संतोष माळी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.