लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : लसीबरोबरच रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा जाणीवपूर्वक कमी करून केंद्रातील भाजप सरकार महाराष्ट्रात अराजकता माजवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप ग्रामविकास व कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला. राज्य सरकार केंद्राकडे सातत्याने रेमडेसिविरची मागणी करते, मात्र ते इंजेक्शन देत नाहीत, मात्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर व आमदार प्रसाद लाड यांना दीव-दमणमध्ये ५० हजार इंजेक्शन कशी मिळतात, यावरून भाजपची प्रामाणिकता दिसून येते. रेमडेसिविर इंजेक्शनअभावी होणाऱ्या मृत्यूस केंद्र सरकारच जबाबदारी असल्याचेही त्यांनी सांगितले.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, केंद्रीय वाणिज्य व रेल्वे मंत्री पीयूष गोयल हे मुंबईचे आहेत. मात्र, महाराष्ट्रातील पाच लोकसुद्धा त्यांना ओळखत नाहीत. अशी मंडळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आघाडी सरकारवर टीका करतात, त्यांचा आपण निषेध करतो. रेमडेसिविर इंजेक्शन व ऑक्सिजन पुरवठ्यावर पूर्णपणे केंद्र सरकारचे नियंत्रण आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने हवाई अथवा जल मार्गाने ऑक्सिजनचा पुरवठा करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केंद्राकडे पाठपुरावा करत आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रातील जनतेकडे लक्ष देण्यास वेळ नाही. व्हील चेअरवरून प्रचार करणाऱ्या पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी यांच्या पराभवासाठी त्यांनी कंबर कसली आहे. हे कशाचे द्योतक आहे, कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जावी आणि राज्य सरकारबद्दल नाराजी वाढावी, असे घाणरडे राजकारण भाजप करत आहे. भाजप काय करायचे ते करू देत आम्ही राज्यातील जनतेचे प्राण वाचवण्यासाठी कोणतीही किंमत मोजू, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
चौकट-
चौदा दिवसांचा जनता कर्फ्यू करणार
कोल्हापुरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. नागरिकांनी घराबाहेर पडणे थांबवावे. भाजीपाल्यासह इतर खरेदीसाठी सकाळी दहापर्यंत दोन तास द्यायचे. किमान चौदा दिवसांचा जनता कर्फ्यू करण्याचा विचार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.