लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ब्राह्मण समाजाच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आम्हाला गृहीत धरू नये असे सांगूनही भाजपच्या नेत्यांनी समाजाच्या तोंडाला पाने पुसली. त्यामुळे नाराज झालेल्या ब्राह्मण समाजातील मतदारांनी एकमुखी विचार केल्यामुळे नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत भाजपच्या परंपरागत मतदारसंघात त्यांना दारुण पराभव पत्करावा लागला, असा दावा ब्रम्ह महाशिखर परिषदेचे मकरंद कुलकर्णी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला.
मकरंद कुलकर्णी म्हणाले , ब्राह्मण समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे यासह अन्य मागण्या आम्ही करत आहोत; पण मागच्या पाच वर्षांत सत्तेत असताना भाजप सरकारने समाजासाठी काहीच केले नाही. शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच राज्यातील ब्राह्मण संघटनांच्या ब्रम्ह महाशिखर परिषदेने आपली भूमिका स्पष्टपणे मांडली होती. कोल्हापुरातील गोलमेज परिषदेतही जे कोणी ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेऊन विचार करतील, त्यांना मदत केली जाईल याचा पुनुरुच्चार केला होता. भाजपच्या नेत्यांनी आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. एवढेच नाही तर मेधाताई कुलकर्णी यांची आमदारकी हिरावून घेतली. मिलिंद संपगावकर, शेखर चरेगांवकर यांना केवळ ब्राह्मण म्हणून उमेदवारी नाकारली. त्याचाच फटका भाजपच्या उमेदवारांना बसला, असे कुलकर्णी यांनी म्हटले आहे.
-----------------------------
देवेंद्र फडणवीस कार्यशून्य नेतृत्व..
मकरंद कुलकर्णी म्हणाले , ज्या पक्षाच्या जिवावर नेते मोठे झाले; पण त्यांनी समाजाकडे दुर्लक्ष केले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना या कार्यशून्य माणसाने मागण्या जाणून घेण्याचेही सौजन्य दाखविले नाही. त्यांनी समाजाची फसवणूक केली. यापुढेही कोल्हापूरसह पुणे, औरंगाबाद महानगरपालिकेत समाजाला दुखावल्याचे परिणाम पाहायला मिळतील, असा इशाराही त्यांनी दिला.
-----------------------------
नेत्यांची मग्रुरी उतरवली
मकरंद कुलकर्णी म्हणाले , भाजपच्या नेत्यांना प्रचंड मग्रुरी आली होती. जर पराभव झाला तर हिमालयात जातो असे नेते बोटांच्या चिटक्या वाजवून म्हणत होते. कसली ही मग्रुरीची भाषा. राजकारणात इतकी मग्रुरी चालत नाही हेच आम्ही दाखवून दिले.