गडहिंग्लज : परमवीरसिंग यांना हाताशी धरून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीची बदनामी आणि सरकार पाडण्याचा भाजपाचा प्रयत्न सुरू आहे; परंतु भाजपाचे हे स्वप्न कधीच फलद्रूप होणार नाही, असा विश्वास ग्रामविकास व कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज रविवारी व्यक्त केला.
गडहिंग्लज विभागातील कोरोना परिस्थितीचा आढावा आणि गोकुळ निवडणुकीच्या प्रचार मेळाव्यानिमित्ताने मंत्री मुश्रीफ, गृहराज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, खासदार प्रा. संजय मंडलिक हे गडहिंग्लज विभागाच्या दौऱ्यावर आले होते.
मुश्रीफ यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना माजी पालकमंत्री तथा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील कारवाईसंदर्भात आपण प्रतिकिया दिली त्यावेळी मुश्रीफांना नेहमी प्रतिक्रिया देण्याची घाई झालेली असते, असे चंद्रकांतदादा म्हणाले होते.
मात्र, ज्यादिवशी परमवीरसिंगांनी १०० कोटींच्या मागणीचे पत्र दिले. त्याचदिवशी या प्रकरणात काहीतरी काळेबेरे असल्याचे स्पष्ट झाले होते. दरम्यान, सगळा तपास झाला तरी उद्योगपती मुकेश अंबांनी यांच्या घरासमोर कुणी स्फोटके ठेवली? हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. त्याचे उत्तर जनतेला मिळाले पाहिजे, असेही मुश्रीफ म्हणाले.
---------------------------
मारुती कांबळेचे काय झाले! ‘सामना’ चित्रपटातील ‘मारुती कांबळे’चे काय झाले? या प्रश्नाप्रमाणे ‘त्या’ स्फोटकांविषयीचा प्रश्नही जनतेच्या मनात कायम आहे. सचिन वाझेची पोलीस कोठडी संपली, तरी अंबानींच्या घरासमोर स्फोटके कुणी ठेवली? का ठेवली? कशासाठी ठेवली? त्याचा मास्टर माइंड कोण? हे स्पष्ट झालेले नाही. ते ‘एनआरए’ने जाहीर करावे, अशी आपली मागणी आहे, असेही मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.