संकेश्वर : भाजपच्या अध:पतनाची सुरुवात कर्नाटकात होणार आहे, तर निधर्मी जनता दल व भाजप हे पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याने राज्यात एक येडी (येडियुराप्पा) व दोन रेड्डी (श्रीरामलू/ जर्नादन रेडी) यांचे राजकारण सुरू आहे. भाजपचा मुकाबला करण्यास कॉँग्रेस सक्षम असल्याने कर्नाटकात कॉँग्रेसला विजयी करा, असे आवाहन खासदार अशोक चव्हाण यांनी केले. संकेश्वर येथे कॉँग्रेसतर्फे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.खासदार अशोक चव्हाण म्हणाले, सिद्धरामय्या सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी केली आहे. राज्यात विविध योजना राबविल्याने राज्य भूक मुक्त झाले आहे. भाजपने ‘बेटी बचाव, बेटी बडाओ’चा खोटा नारा देत आहेत. मोदींनी नोटबंदीच्या नावाने लोकांना नाहक त्रास दिला आहे. राज्यात सक्षम सरकार देण्यासाठी जनतेने आता कॉँग्रेसचे उमेदवार ए. बी. पाटील यांना निवडून द्यावे.पक्ष निरीक्षक व आमदार सतेज पाटील म्हणाले, भाजपचे सरकार हे श्रीमंतांचे आहे. कर्नाटकात कॉँग्रेस सरकारकडून झालेला विकास पहा. मतदारसंघात भाजपच्या लोकप्रतिनिधींनी पाच वर्षांत काय केले आहे हे समजून घेणे गरजेचे आहे. विरोधक मराठीची गरज नाही असे सांगत असून, मराठी बांधवांनी आपला स्वाभिमान दाखविण्यासाठी कॉँग्रेसला साथ द्यावी.व्यासपीठावर प्रा. किसनराव कुराडे, लक्ष्मण चिंगळे, हुक्केरी विधानसभा मतदारसंघातील कॉँग्रेस (आय)चे उमेदवार ए. बी. पाटील, जे. एन. नलवडे, संजय नष्टी, आदी मान्यवर उपस्थित होते.
भाजपच्या अध:पतनाची सुरुवात कर्नाटकातूनच-अशोक चव्हाण : संकेश्वर येथे प्रचार सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2018 11:11 PM