कोल्हापूर -दारासमोर कमळाची रांगोळी आणि घरावर पक्षाचा ध्वज उभारून कार्यकर्त्यांनी भाजपचा ४१ वा स्थापना दिवस मंगळवारी उत्साहात साजरा करण्यात आला.अंत्योदय, सशक्त व संस्कारित-वैचारिक भारत हे ध्येय समोर ठेवत ६ एप्रिल १९८० ला भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अध्यक्षतेखाली भाजपची स्थापना झाली. स्थापना दिवसानिमित्त भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार राज्यामध्ये कोरोनाची नियमावली पाळून विविध सामाजिक उपक्रम राबवून स्थापना दिन साजरा करण्यात आला.प्रदेशाध्यक्ष पाटील त्यांच्या येथील निवासस्थानी पक्षाचा ध्वज व दारामध्ये रांगोळी काढण्यात आली. देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव व भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी सहकुटुंब उपस्थित राहून घरावर पक्षाचा ध्वज उभा केला. कार्यकर्त्यांनी घराच्या दारावर कमळाचे स्टीकर लावले. भाजपाच्या सातही मंडलामध्ये पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, आघाडी-मोर्चा अध्यक्ष व संयोजक तसेच शक्ती केंद्र प्रमुख व बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांनी पक्षाचा ध्वज लावून मिठाई, साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.
राजारामपुरी येथे भाजपा सरचिटणीस विजय जाधव व सहका-यांमार्फत ट.र.ए.इ कर्मचा-यांच्या मुलांना व गरजू विद्यार्थ्यांना ५००० वह्यांचे वाटप करण्यात आले. ट्रान्सपोर्ट आघाडी अध्यक्ष दिलीप बोंद्रे व रिक्षा आघाडी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी ट्रक व रिक्षा यावर भाजपाचा ध्वज लावून प्रवास केला. बिंदू चौक येथील पक्ष कार्यालयाला फुलांचे तोरण बांधण्यात आले, विद्युतरोषणाई करण्यात आली. कार्यालयात कार्यकर्त्यांच्या हस्ते भारत मातेचे प्रतिमा पूजन करण्यात आले.