आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. २0 : देशाच्या घटनात्मकदृष्ट्या सर्वोच्च स्थानी राष्ट्रपतिपदावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचार मुशीतून तयार झालेली व्यक्ती भाजपला आणायची आहे. धर्माधिष्ठित राज्य आणण्याच्या दृष्टीने टाकलेले हे पाऊल आहे. ज्यांचा संविधानावर विश्वास आहे, अशा शक्तींनी हे प्रयत्न हाणून पाडले पाहिजेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी मंगळवारी येथे केले.
ज्येष्ठ नेते दिवंगत गोविंद पानसरे यांच्या स्मृती जागविण्यासाठी काढण्यात आलेल्या ‘निर्भय बनो...’ मॉर्निंग वॉकच्या प्रारंभी ते बोलत होते. साने गुरुजी वसाहतीत ही जागृती फेरी काढण्यात आली. पानसरे हत्या प्रकरणातील संशयित समीर गायकवाड याच्याविरुद्ध भक्कम पुरावे न्यायालयात सादर करण्यात सरकार कमी पडल्याने राज्य सरकारचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. ‘विवेकाचा आवाज बुलंद करूया...’ ‘लढेंगे जितेंगे,’ ‘आम्ही सारे पानसरे’ अशा घोषणा देत ही फेरी त्या परिसरातून फिरून पुन्हा साने गुरुजी वसाहतीच्या मुख्य चौकात आल्यानंतर तिचा समारोप झाला. तिथे शिवशाहीर राजू राऊत यांनी ‘अंधार फार झाला... एक दिवा पाहिजे... या दुनियेला जिजाऊचा शिवा पाहिजे,’ या शाहिरी गीताने फेरीचा समारोप करण्यात आला.
नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे व एम. एम. कलबुर्गी या विचारवंतांच्या खूनप्रकरणी आतापर्यंत दोनच आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांतीलही संशयित गायकवाड याला दोन दिवसांपूर्वी जामीन मिळाला. सरकार या खटल्याकडे जेवढ्या गांभीर्याने लक्ष द्यायला हवे तेवढे देत नाही. त्याचा परिणाम म्हणूनच गायकवाडची सुटका झाली आहे. त्याच्याविरोधात उच्च न्यायालयात खटला दाखल करणार असल्याचे मेघा पानसरे यांनी सांगितले.
या फेरीमध्ये ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. जयसिंगराव पवार, दिलीप पवार, सुरेश शिपूरकर, व्यंकाप्पा भोसले, प्राचार्य टी. एस. पाटील, इंदुमती दिघे, अतुल दिघे, अरुण सोनाळकर, शिवाजीराव परुळेकर, बाळकृष्ण शिरगावकर, मुकुंद वैद्य, प्राचार्य विलास पोवार, प्रा. छाया पोवार, स्वाती कृष्णात, सुनीलकुमार सरनाईक, आर. वाय. आपटे, भरत लाटकर, संभाजीराव जगदाळे, सीमा पाटील, बिजली कांबळे, अनिल चव्हाण, कृष्णात कोरे, आर्किटेक्ट जीवन बोडके, सतीश पाटील, आलासे, सागर दळवी, आदींसह विविध स्तरांतील लोक सहभागी झाले.
पुढील मॉर्निंग वॉक २० जुलैला
रिंग रोडवरील क्रांतिसिंह नाना पाटीलनगरातील मुख्य बसथांब्याजवळून सुरू होईल. त्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.